पुणे : भारतीय ॲथलेटिक्समध्ये गेल्या काही वर्षांत लक्षणीय बदल दिसून येत असून विशेषत: ‘ट्रॅक अँड फील्ड’ प्रकारात भारतीय खेळाडूंचा वेग, सातत्य आणि आत्मविश्वास यामध्ये मोठी वाढ झाली आहे. अलीकडे झालेल्या फेडरेशन चषक स्पर्धेत ही प्रगती स्पष्टपणे दिसून आली. १०० मीटर शर्यतीत गुरिंदरवीर सिंग आणि अनिमेष कुजूर यांच्यातील चुरशीमुळे भारतीय धावपटू आता जागतिक स्तरावर स्पर्धा करण्यास तयार होत असल्याचे संकेत मिळाले. या स्पर्धेत अवघ्या २४ तासांत १०० मीटरचा राष्ट्रीय विक्रम तीन वेळा मोडला गेला.
चारशे मीटरमध्ये विशालने ४५ सेकंदांच्या आत शर्यत पूर्ण करत नवा इतिहास रचला. हेप्टॅथलॉनमध्ये तेजस्विन शंकरने आठ हजार गुणांचा टप्पा गाठला, तर उंच उडीत महाराष्ट्राच्या सर्वेश कुशारेने उल्लेखनीय कामगिरी केली. अडथळा शर्यतीत तेजस शिरसे चमकला, तर हातोडाफेकमध्ये मनप्रीत कौरने प्रभाव पाडला, तर गोळाफेकमध्ये समरदीप सिंग गिल याने तेंजिदरपाल सिंग तूर याच्यासमोर आव्हान उपस्थित केले. भारतीय ॲथलेटिक्सपटूंच्या प्रगतीमागे खासगी प्रशिक्षण केंद्रे, खेळाडूंची बदलेली मानसिकता आणि मेहनत घेण्याची तयारी ही प्रमुख कारणे ठरत आहेत.
भारतीय ॲथलेटिक्सवर उत्तेजक सेवनाच्या घटनांचे सावट असले, तरी फेडरेशन चषकातील कामगिरी भारताच्या वाढत्या ॲथलेटिक्स क्षमतेचे सकारात्मक चित्र समोर आणते. या प्रगतीमागे खासगी प्रशिक्षण केंद्रांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते. भारतीय ॲथलेटिक्स महासंघाने प्रशिक्षण व्यवस्थेत खासगी क्षेत्राचा सहभाग वाढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्याचे सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत. या केंद्रांमध्ये परदेशी प्रशिक्षक, वैज्ञानिक प्रशिक्षण पद्धती, पोषणतज्ज्ञ आणि आधुनिक उपकरणांची सुविधा मिळत असल्याने खेळाडूंच्या कामगिरीत सातत्याने सुधारणा होते.
खेळाडूंच्या शरीररचनेचा अभ्यास, पावलांची हालचाल, वेग निर्माण करण्याची पद्धत, दुखापती टाळण्याचे तंत्र आणि योग्य आहार यावरही विशेष भर दिला जातो. आधुनिक स्पाइक शूजच्या वापरामुळेही धावपटूंच्या वेगात वाढ झाली असून दुखापती कमी झाल्या आहेत. यासह भारतीय खेळाडूंची मानसिकताही बदलली आहे.
गुरिंदरवीरचे लक्षवेधी यश
यंदाच्या फेडरेशन चषकात गुरिंदरवीर सिंगने १०.०९ सेकंदाच्या राष्ट्रीय विक्रमी वेळेसह १०० मीटरची शर्यत पूर्ण केली. त्याने याच स्पर्धेत २०२१ मध्ये १०.२७ अशी वेळ नोंदवली होती. मात्र, त्यानंतर त्याने झपाट्याने प्रगती केली. ‘‘माझ्या मानसिकतेत मोठा बदल झाला आहे. मला लवकरच माझ्या राष्ट्रीय विक्रमात सुधारणा करायची आहे,’’ असे गुरिंदरवीरने एका मुलाखतीत सांगितले.
