महिला विश्वचषकात अंतिम सामन्यात इंग्लंडच्या संघाकडून ९ धावांनी हार पत्करावा लागलेला भारतीय महिलांच्या संघाच मायदेशात आगमन झालंय. आज मुंबईत महिला संघाची पत्रकार परिषद पार पडली, ज्यामध्ये कर्णधार मिताली राजने संपूर्ण भारतीय क्रीडारसिकांचे आभार मानले. आपल्या सर्व खेळाडूंनी केलेल्या खेळाचा आपल्याला अभिमान असल्याचंही मितालीने यावेळी वारंवार स्पष्ट केलं.

मात्र हातातोंडाशी आलेला सामना गेल्यामुळे भारतीयांच्या मनामधून हा पराभव काही केल्या जाताना दिसत नाहीये. भारताच्या मधल्या फळीतल्या फलंदाजांनी केलेल्या हाराकिरीमुळे भारताला या सामन्यावर पाणी सोडावं लागलं. स्वतः कर्णधार मिताली राज ज्या पद्धतीने धावबाद झाली होती, त्यावरुन अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं. यावरुन सोशल मीडियावर अनेकांनी हा सामनाही फिक्स होता की काय अशी शंका व्यक्त केली होती. याबद्दल पत्रकार परिषदेत प्रश्न विचारला असताना मिताली त्या रनआऊटबद्दल आपलं स्पष्टीकरण दिलेलं आहे.

“अंतिम फेरीत मी बाद झाल्यानंतर सोशल मीडियावर अनेक विचित्र गोष्टी फिरताना पाहिल्या. मात्र त्यावेळी धाव घेताना माझे बूट धावपट्टीवर अडकले होते. पुनमने फटका खेळल्यानंतर मला धाव घेण्यासाठी हाक दिली, ज्यावर मी होकार देत धाव घेतलीही. मात्र धावपट्टीच्या मध्यभागी माझे बटू जमिनीत रुतल्यामुळे मी पाय तितक्या चपळाईतेने उचलू शकले नाही. टिव्ही कॅमेऱ्यांनी त्यावेळी नेमकं काय दाखवलं असेल याची मला कल्पना नाही, मात्र त्यावेळी माझा नाईलाज होता”, असं म्हणत मितालीने गेले काही दिवस चर्चांना पूर्णविराम दिला.

इंग्लंडने दिलेल्या २२९ धावांचा पाठलाग करताना भारत एकवेळ सामन्यात मजबूत वाटत होता. मात्र पुनम राऊत बाद झाल्यानंतर भारतीय डावाची घसरगुंडीत उडाली. त्यातून भारतीय संघ सावरुच शकला नाही. केवळ २८ धावांमध्ये ७ बळी देत भारताने इंग्लंडला सामना अक्षरशः बहाल केला होता. मात्र त्यानंतरही ज्या पद्धतीने भारतीय महिलांनी अंतिम फेरीत खेळ केला, त्याला भारतीय प्रेक्षकांनी आणि बीसीसीआयने खुल्या मनाने दाद देत, महिलांच्या संघावर कौतुकाचा वर्षावही केला.