वृत्तसंस्था, मुंबई

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या काही काळापासून गमावलेली लय परत मिळविण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या भारतीय कर्णधार रोहित शर्माने मुंबई रणजी क्रिकेट संघाच्या मंगळवारी झालेल्या सराव सत्रात हजेरी लावली. ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सत्रात रोहितने मुंबईचा कर्णधार आणि भारतीय संघातील माजी सहकारी अजिंक्य रहाणे याच्या साथीने बराच वेळ लाल चेंडूविरुद्ध फलंदाजी केली.

३७ वर्षीय रोहितसाठी गेले काही आठवडे विसरण्याजोगे ठरले आहेत. बॉर्डर-गावस्कर करंडकासाठी नुकत्याच झालेल्या कसोटी मालिकेतील तीन सामन्यांत मिळून रोहितला केवळ ३१ धावा करता आल्या. अपत्यप्राप्ती झाल्याने त्याला पहिल्या कसोटीला मुकावे लागले होते. त्यानंतर दुसऱ्या कसोटीसाठी संघात पुनरागमन झाल्यावर त्याला मधल्या फळीत खेळावे लागले. मात्र, सलग दोन सामन्यांतील निराशाजनक कामगिरीनंतर त्याने या मालिकेतील मेलबर्न येथे झालेल्या चौथ्या कसोटीत सलामीला परतण्याचा निर्णय घेतला, परंतु त्याला यश मिळाले नाही. त्यामुळे सिडनी येथे झालेल्या निर्णायक पाचव्या कसोटी सामन्यासाठी त्याने स्वत:हून संघाबाहेर राहणे पसंत केले.

हेही वाचा >>>Champions Trophy 2025 : ऋषभ पंत की संजू सॅमसन, चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघात कोणाला मिळणार संधी? घ्या जाणून

रोहितची कसोटी कारकीर्द आता धोक्यात असल्याचे मानले जात आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील भारतीय संघाच्या कामगिरीचे रविवारी झालेल्या बैठकीत अवलोकन करण्यात आले. या बैठकीत रोहित, भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर, ‘बीसीसीआय’चे नवनियुक्त सचिव देवजित सैकिया उपस्थित होते. आगामी चॅम्पियन्स करंडक स्पर्धेसाठी भारतीय संघाचे नेतृत्व रोहितकडेच राहणे अपेक्षित आहे. त्याआधी लय मिळविण्याचा रोहितचा प्रयत्न आहे.

रणजी करंडक स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्याला २३ जानेवारीपासून सुरुवात होणार असून मुंबईसमोर जम्मू आणि काश्मीर संघाचे आव्हान असेल. हा सामना ‘एमसीए’-‘बीकेसी’ अकादमीच्या मैदानावर होणार आहे. बाद फेरी गाठण्याच्या दृष्टीने मुंबईसाठी हा सामना महत्त्वाचा ठरणार आहे. या सामन्यात रोहित खेळणार का, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. ‘‘आता तो केवळ सराव सत्रात सहभाग नोंदवणार असून रणजी सामन्यासाठी त्याची उपलब्धता तो लवकरच कळवेल,’’ असे मुंबई क्रिकेट संघटनेतील (एमसीए) सूत्राकडून सांगण्यात आले. रोहितने मुंबईसाठी आपला अखेरचा रणजी सामना २०१५ मध्ये उत्तर प्रदेशविरुद्ध खेळला होता.

बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिका गमाविल्यानंतर प्रशिक्षक गंभीरने भारतीय खेळाडूंना देशांतर्गत स्पर्धांत खेळण्याचे आवाहन केले होते. ‘‘भारतीय संघातील प्रत्येक खेळाडूने लाल चेंडूविरुद्ध खेळण्याची आपली क्षमता पुन्हा सिद्ध करण्याची गरज आहे,’’ असे गंभीर म्हणाला होता. आता प्रशिक्षकांच्या आवाहनाला रोहित दाद देणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

हेही वाचा >>>भारतीय खेळाडू ‘काफिर’; पाकिस्तानी खेळाडूची टीम इंडियावर आगपाखड, भारताच्या माजी खेळाडूने सांगितला ‘तो’ प्रसंग

‘मुंबईच्या क्रिकेटपटूंकडून कोहलीने शिकावे’

मुंबईच्या क्रिकेटपटूंचे उदाहरण देताना दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट संघटनेचे (डीडीसीए) सचिव अशोक शर्मा यांनी तारांकित फलंदाज विराट कोहलीला दिल्लीकडून रणजी करंडकात खेळण्याचे आवाहन केले आहे. ‘‘विराट आणि ऋषभ पंत या दोघांचेही दिल्लीच्या संभाव्य संघात नाव आहे. रणजी करंडकाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आता दिल्ली संघाच्या सराव शिबिराला सुरुवात झाली आहे. विराटने मुंबईच्या क्रिकेटपटूंकडून शिकले पाहिजे. ते जेव्हा उपलब्ध असतात, तेव्हा मुंबईकडून खेळण्याचा प्रयत्न करतात. दिल्ली क्रिकेटमध्ये याच गोष्टीची कमतरता आहे. विराट आणि ऋषभने किमान एक रणजी सामना खेळला पाहिजे,’’ असे अशोक शर्मा ‘एक्स्प्रेस वृत्तसंस्थे’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले.