Shubman Gill Named As Cricketer Of The Year: भारतीय संघातील स्टार फलंदाज शुबमन गिलला आयसीसी टी-२० वर्ल्डकप स्पर्धेला सुरूवात होण्याआधी टी-२० संघातून बाहेर करण्यात आलं होतं. पण वनडे आणि कसोटी संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी गिलकडेच आहे. गिलने गेल्या वर्षात वनडे आणि कसोटी क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केली होती. भारतासाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या गिलचा बीसीसीआयकडून मोठा सन्मान केला जाणार आहे. गिलचा क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्काराने सन्मान केला जाणार आहे. तर भारतीय संघाला टी-२० वर्ल्डकप जिंकून देणारे आणि भारतीय क्रिकेटमध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या राहुल द्रविड यांचा कर्नल सी.के. नायडू जीवनगौरव पुरस्काराने सन्मान केला जाणार आहे.

इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, दिल्लीत १५ मार्चला बीसीसीआयकडून पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले जाणार आहे. बीसीसीआयकडून दरवर्षी दमदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना नमन पुरस्कार दिला जातो. भारताचा वनडे आणि कसोटी संघाचा कर्णधार शुबमन गिलला क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार दिला जाणार आहे. तर भारतीय संघाला अंडर-१९ वर्ल्डकप जिंकून देणारा कर्णधार आयुष म्हात्रेचा लाला अमरनाथ पुरस्काराने सन्मान केला जाणार आहे. तसेच भारताची माजी कर्णधार मिताली राजला देखील जीवनगौरव पुरस्कार दिला जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वोत्तम क्रिकेट असोसिएशनचा पुरस्कार हा मुंबई क्रिकेट असोसिएशनला दिला जाणार आहे.

राहुल द्रविड यांना जीवनगौरव पुरस्कार

राहुल द्रविड यांनी आपल्या काळात मैदान गाजवलं आहे. भारतीय क्रिकेटमधील टॉप ४ फलंदाजांचा यादीत राहुल द्रविड यांचा देखील समावेश आहे. गोलंदाज गोलंदाजी करून करून थकून जायचा पण राहुल द्रविड काही विकेट फेकत नव्हते. मोठी खेळी करण्याची क्षमता असल्यामुळे त्यांना भारताची भिंत असं नाव दिलं गेलं होतं. राहुल द्रविड यांच्या नावे १० हजारांहून अधिक धावा करण्याची नोंद आहे.

राहुल द्रविड यांनी २०१२ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. त्यानंतर त्यांनी काही वर्ष समालोचन केल. त्यानंतर त्यांनी प्रशिक्षकाची भूमिका बजावली. राहुल द्रविड यांनी पृथ्वी शॉ, यशस्वी जैस्वाल आणि शुबमन गिलसारखे फलंदाज घडवले. भारतीय संघाला अंडर- १९ वर्ल्डकप जिंकून देण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली. २०२४ मध्ये राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली खेळताना भारताने टी-२० वर्ल्डकप जिंकण्याचा मान पटकावला होता. तर २०२३ मध्ये झालेल्या वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील फायनलमध्ये प्रवेश केला होता.