येत्या २७ ऑगस्टपासून आशिया चषकाला सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी भारतीय संघ झिम्बाब्वेसोबत तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. जे खेळाडू झिम्बाब्वे दौऱ्यावर नाहीत ते आशिया चषकाची तयार करण्यात व्यग्र आहेत. या दरम्यान भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माचे एक वक्तव्य चर्चेत आले आहे. बाकांवरील खेळाडूंची संख्या वाढावी यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे तो म्हणाला आहे.

स्टार स्पोर्ट्सच्या ‘फॉलो द ब्लूज’ या कार्यक्रमात बोलताना रोहित म्हणाला, “आम्ही वर्षभर खूप क्रिकेट खेळतो. त्यामुळे खेळाडूंच्या दुखापती आणि कामाचा ताण यांचे व्यवस्थापन महत्त्वाचे आहे. वर्षभर आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रिकेट सामन्यांचे आयोजन पाहता एक मजबूत बेंच स्ट्रेंथ (पर्यायी खेळाडूंचा मोठा गट) तयार करणे आवश्यक आहे. म्हणून टी २० विश्वचषकानंतर भारतीय संघात अनेक बदल करण्यात आले.”

हेही वाचा – Asia Cup 2022: आशिया चषकाबाबत ‘या’ रंजक गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

रोहित शर्मा पुढे म्हणाला, “आम्हाला भक्कम बेंच स्ट्रेंथ तयार करायची आहे. जेणेकरून भारतीय क्रिकेटचे भविष्य सुरक्षित हातात जाईल. त्यादृष्टीने आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोत.” आगामी आशिया चषकामध्ये आणि ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी २० विश्वचषकात रोहितकडे संघाचे नेतृत्व आहे. त्याच्या नेतृत्त्वाखाली आतापर्यंत भारतीय संघाने द्विपक्षीय मालिकांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. आता आयसीसीच्या स्पर्धेमध्ये संघ कशी कामगिरी करेल, याबाबत चाहत्यांना उत्सुकता आहे.