क्रीडा आणि मनोरंजन विश्वातील ‘पॉवरकपल’ म्हणून ओळख असलेली विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांची जोडी सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. रविवारी या दोघांनी एक स्तुत्य उपक्रम करत सर्वांची वाहवा मिळवली आहे. काल रविवारी 4 एप्रिलला जागतिक प्राणी दिवस साजरा करण्यात आला. यानिमित्ताने विराट-अनुष्काने भटक्या प्राण्यांसाठी एक विशेष काम केले आहे.

जागतिक प्राणी दिनानिमित्त विराट कोहलीने जनावरांची काळजी आणि कल्याणासाठी एक खास उपक्रम सुरू केला आहे. विराट कोहली फाउंडेशन या संस्थेद्वारे विराट भटक्या प्राण्यांच्या कल्याणासाठी काम करणार आहे. या खास उपक्रमासाठी विराट कोहलीने आपली पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्माला प्रेरणास्त्रोत म्हटले आहे. या संस्थेद्वारे विराटने मुंबईत प्राण्यांसाठी दोन निवारा घरे उघडली आहेत.

 

विराटने आपल्या ट्विटर हँडलवरून यासंदर्भातील माहिती शेअर केली आहे. ”भटक्या प्राण्यांचे आरोग्य आणि त्यांना सहकार्य मिळावे यासाठी विवाल्डीसच्या सहकार्याने आता पशू कल्याणाकडे पहिले पाऊल उचलले आहे. मला माझी पत्नी अनुष्का शर्माचे आभार मानायचे आहेत. प्राण्यांबद्दल आवड आणि हक्कांसाठी मला तिने प्रेरणा दिली.”

इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार विराटने सांगितले की, ”प्राण्यांच्या कल्याणाची काळजी घेणे हे माझ्या हृदयाच्या अगदी जवळ आहे, कारण अनुष्का या विषयात खूप भावनिक आहे. भटक्या प्राण्यांना मदत करण्याची तिची दृष्टी मला खरोखर प्रेरणा देणारी आहे. मी जेव्हा तिला भेटलो, तेव्हापासून मी प्राण्यांचे हक्क आणि त्यांच्यासाठी वैद्यकीय मदतीची तातडीची गरज समजून घेण्याचा प्रयत्न केला.”

”आपल्या शहरातील भटक्या प्राण्यांसाठी एक सुरक्षित जागा तयार करण्याचे आमचे स्वप्न आहे. विवाल्डीस आणि आवाज यांच्याबरोबर या उपक्रमात काम करण्यात मला आनंद होत आहे”, असेही विराटने सांगितले.