आयपीएल २०२१ समाप्तीच्या दोन दिवसानंतर लगेचच टी-२० विश्वचषक स्पर्धा सुरू होईल. आयपीएलच्या या मोसमातील अंतिम सामना १४ ऑक्टोबर रोजी खेळला जाईल, त्यानंतर टी-२० विश्वचषक १७ ऑक्टोबर रोजी पहिल्या फेरीच्या सामन्याने सुरू होईल. पहिली फेरी संपल्यानंतर सुपर-१२ चे सामने आयोजित केले जातील, ज्यामध्ये भारतासह उर्वरित दिग्गज संघ एकमेकांशी स्पर्धा करताना दिसतील. भारतीय संघाचे खेळाडू सध्या आयपीएलमध्ये सहभागी होत आहेत. स्पर्धा संपल्यानंतर टीम इंडियाचे सर्व खेळाडू चेन्नई सुपर किंग्जच्या हॉटेलमध्ये पोहोचतील. चेन्नईचे खेळाडू सध्या Th8 पाम हॉटेलमध्ये थांबले आहेत.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आगामी टी-२० विश्वचषकासाठी हे हॉटेल निवडले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने म्हटले आहे, की भारतीय संघ Th8 पाम येथे थांबण्याची शक्यता आहे. बीसीसीआय आणि हॉटेल यांच्यातील करार अद्याप निश्चित झालेला नाही. आयपीएलनंतर खेळाडू थेट बायो बबलमध्ये सामील होतील आणि कोचिंग स्टाफ २ ऑक्टोबरच्या आसपास दुबईला पोहोचेल. टी-२० विश्वचषकाच्या बायो बबलचा भाग बनण्यापूर्वी कोचिंग स्टाफला सहा दिवस क्वारंटाइन राहणे आवश्यक आहे.

हेही वाचा – टी-२० वर्ल्डकप फायनलसाठी घेण्यात येणार ‘मोठा’ निर्णय?; BCCI करतंय जोरदार तयारी

टी-२० विश्वचषक १७ ऑक्टोबरपासून सुरू होईल आणि अंतिम सामना १४ नोव्हेंबरला खेळला जाईल. या प्रमुख स्पर्धेचे सर्व सामने यूएई आणि ओमान येथे होणार आहेत. टी-२० विश्वचषक दोन फेऱ्यांमध्ये खेळला जाईल. त्यानंतर उपांत्य आणि अंतिम फेरी होईल. या स्पर्धेत एकूण १६ संघ सहभागी होतील. पहिल्या फेरीत आठ संघ भाग घेतील, जे दोन गटांमध्ये विभागले गेले आहेत. सुपर १२ देखील दोन गटांमध्ये विभागले गेले आहे. गट १ आणि २ मध्ये प्रत्येकी ६ संघ असतील.