अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या टी२० लढतीपूर्वी भारतीय संघ एका नव्या बदलाला सामोरा गेला. केंद्र सरकारच्या नव्या निर्देशानुसार, राष्ट्रगीतापूर्वी वंदे मातरम वाजवलं जाईल. दोन देशांच्या मालिकेदरम्यान राष्ट्रगीत होतं. रविवारी होणाऱ्या लढतीपूर्वी दोन्ही संघ राष्ट्रगीतासाठी सज्ज झाले. जनगणमन सुरू होईल असं चाहत्यांना वाटलं होतं. मात्र त्याआधी वंदे मातरम सुरू झालं. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार, वंदे मातरमची सहा कडवी वाजवण्यात येतात. टीम इंडियाच्या बहुतांश खेळाडूंना वंदे मातरमचं पहिलं कडवं पाठ होतं. मात्र पुढची कडवी पाठ नसल्याचं दिसलं. सहा कडव्यांनंतर वंदे मातरम संपलं. य
प्रचंड उकाडा आणि आर्द्रता असल्यामुळे टीम इंडियाचे खेळाडू वंदे मातरम होईपर्यंत घामाघूम झाले. वंदे मातरम संपल्यानंतर आता अफगाणिस्तानचं राष्ट्रगीत सुरू होईल असं त्यांना वाटलं. पण काही सेकंदात जनगणमन सुरू झालं आणि सगळे खेळाडू सावधान पवित्र्यात राष्ट्रगीत म्हणू लागले. अनेक वर्ष सामन्यापूर्वी जनगणमन सुरू होण्याची आणि म्हणण्याची सवय असल्याने वंदे मातरम म्हणण्याचा अनुभव भारतीय खेळाडूंसाठी नवीन होता.
राजधानी दिल्लीतल्या अरुण जेटली आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर अफगाणिस्तानतर्फे टी२० मालिका आयोजित करण्यात आली आहे. भारतीय संघाची घरच्या मैदानावर पाहुणे म्हणून खेळण्याची ही पहिलीच वेळ आहे. पाहुणा संघ असल्याने भारतीय संघ पाहुण्या संघाच्या ड्रेसिंगरुममध्ये असणार आहे.
भारतीय संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरने टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतला आहे. दुखापतीतून सावरत जसप्रीत बुमराह पुनरागमन करत आहे. इशान किशन सरावादरम्यान दुखापतग्रस्त झाला होता. मात्र तो अंतिम अकरात आहे. वैभव सूर्यवंशीऐवजी अनुभवी संजू सॅमसनचा संघात समावेश करण्यात आला आहे.
इब्राहिम झाद्रान अफगाणिस्तानचा नवा कर्णधार आहे. रशीद खान आणि मोहम्मद नबी हे अनुभवी शिलेदार संघात आहेत. दिल्लीत मोठ्या प्रमाणावर अफगाणिस्तानचे नागरिक राहत असल्याने इथे ही मालिका आयोजित करण्यात आली आहे.
