क्रिकेटपटू कृणाल पांड्या याचं ट्विटर अकाऊंट आज काही काळासाठी हॅक करण्यात आलं होतं. बिटकॉइनच्या बदल्यात हे अकाऊंट विकण्याचाही प्रयत्न या हॅकरने केला होता. त्याने या अकाऊंटवरून काही असभ्य कमेंट्सही केल्या. या हॅकरने केलेले ट्वीट्स आता डिलीट करण्यात आले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, गुरुवारी कृणालच्या ट्विटर हँडलवरून १० ट्वीट्स करण्यात आले. ज्यामध्ये बिटकॉइनच्या देवाणघेवाणीबद्दल बोलण्यात आलं होतं. तसंच असभ्य भाषेतले काही ट्वीट्सही हॅकरने केले होते. काही काळानंतर त्याचं हॅक झालेलं अकाऊंट पुन्हा पूर्ववत करण्यात आलं. हॅकरचे हे १० ट्वीट्स आता डिलीट करण्यात आले आहेत. कृणालने याविषयी अधिकृतरित्या काही माहिती दिलेली नाही. कृणालचे शेवटचे ट्वीट १८ जानेवारीचं असल्याचं दिसत आहे. या ट्वीटमध्ये त्याने सरावादरम्यानचा व्हिडीओ शेअर केला आहे.

याआधीही काही क्रिकेटपटूंची ट्विटर हँडल्स हॅक झाल्याच्या घटना घडल्या आहेत. २०१९ साली ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू शेन वॉर्न याचं ट्विटर आणि इन्स्टाग्राम अकाऊंटही हॅक झालं होतं. त्यानंतर गेल्या वर्षी भारतीय यष्टीरक्षक पार्थिव पटेलचं इन्स्टाग्राम अकाऊंटही हॅक करण्यात आलं होतं. तर २०१५ मध्ये जेव्हा श्रीलंकेचा यष्टीरक्षक कुमार संगकाराचं ट्विटर हँडल हॅक झालं होतं, त्यावेळी त्याच्या अकाऊंटवरून काही आक्षेपार्ह फोटो पोस्ट करण्यात आले होते.

कृणाल गेल्या वर्षी २०२१ पर्यंत IPL मध्ये मुंबई इंडियन्स या संघाकडून खेळत होता. IPL 2022 साठी होणाऱ्या खेळाडूंच्या लिलावात त्याचा समावेश करण्यात येणार आहे. पुढच्या महिन्यात हा लिलाव होईल.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian cricketer krunal pandya twitter handle hack now restored vsk
First published on: 27-01-2022 at 16:58 IST