धोनीपाठोपाठ भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू सुरेश रैना यानंदेखील आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. सुरेश रैनानं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरूनच आपली निवृत्ती जाहीर केली आहे. २०१८ मध्ये रैना आपला अखेरचा एकदिवसीय सामना खेळला होता. तर २०१५ मध्ये तो अखेरचा कसोटी सामना खेळला. रैनाच्या निवृत्तीपूर्वीच भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी यानंही आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला होता. त्याच्या निवृत्तीच्या घोषणेच्या काही वेळातच रैनानंही आपल्या निवृत्तीची घोषणा केली.

रैनानं आतापर्यंत भारतासाठी १८ कसोटी सामने, २२६ एकदिवसीय सामने आणि ७८ टी-२० सामने खेळले आहेत. तर त्याच्या नावावर एकदिवसीय सामन्यांमध्ये ५,६१५ धावा आहेत. तर त्यानं एकदिवसीय सामन्यांमध्ये ३६ विकेट्सही घेतल्या आहेत. तर त्यानं आतापर्यंत १८ कसोटी सामन्यांमध्ये ७६८ धावा आणि १३ विकेट्स आणि टी-२० सामन्यांमध्ये १,६०५ धावा केल्या आहेत.

दरम्यान, रैनानं इन्स्टाग्रामवरून माहिती देत आपली निवृत्ती जाहीर केली. “धोनी तुझ्यासोबत खेळण्याचा आनंद निराळा होता. त्यामुळे तू निवृत्ती घेतल्यानंतर मीदेखील या प्रवासात तुझ्यासोबत येण्याचा निर्णय घेतला आहे. टीम इंडिया धन्यवाद. जय हिंद,” असं तो म्हणाला.

धोनीनंही जाहीर केली निवृत्ती

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून धोनीनं निवृत्ती घेतली असली तरी तो आयपीएल सामन्यांमध्ये मात्र दिसणार आहे. ३९ वर्षीय धोनीनं यापूर्वीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. महेंद्रसिंह धोनीनं आपल्या इन्स्टाग्राम पोस्टद्वारे आपल्या निवृत्तीची घोषणा केली. “सर्वांनी दिलेल्या प्रेमाबद्दल धन्यवाद. आज संध्याकाळी ७.२९ पासून मला निवृत्त समजलं जावं,” असं त्यानं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. त्या पोस्टसोबतच धोनीनं एक व्हिडीओही शेअर केला आहे.