भारताची माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी त्याच्या खेळाबरोबरच त्याच्या अगदी साधेपणासाठीही ओळखला जातो. धोनीने देशाच्या क्रिकेट संघाचं कर्णाधारपद असो की आयपीएलमधील संघाचं नेतृत्व असो प्रत्येक ठिकाणी आपल्या शांत आणि संयमी वर्तनाने सर्वांचीच मनं जिंकली आहेत. त्याच्या याच स्वभावाचे जगभरात चाहते आहेत. धोनी मितभाषीही आहे. मात्र, त्याचं मोजकं आणि महत्त्वाचं व्यक्त होणं अनेकदा चर्चेचा विषय ठरतं. आता त्याने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर तब्बल दोन वर्षांनी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ जोरदार चर्चेत आहे.
धोनी व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये म्हणाला, “काहीतरी नवीन शिकून आनंद वाटला, पण काम पूर्ण व्हायला खूप वेळ लागला.”
व्हिडीओत नेमकं काय?
या व्हिडीओत महेंद्रसिंह धोनी ट्रॅक्टर चालवताना दिसत आहे. धोनीने स्वतः ट्रॅक्टर चालवत शेत नांगरणी केली. तसेच रोटा हिटरने नांगरलेल्या शेताची मशागतही केली.
व्हिडीओ पाहा :
धोनी ट्रॅक्टरने शेताची नांगरणी करताना त्याच्याबरोबर आणखी एक व्यक्ती ट्रॅक्टरवर बसलेली दिसत आहे. या व्हिडीओतून धोनीला शेतीचीही आवड असल्याचं पाहायला मिळत आहे. केवळ आवडीवरच धोनी थांबला नाही. धोनी स्वतः शेती काम शिकण्यासाठी मातीत उतरला आणि त्याने शेती काम शिकण्यास सुरुवात केली.
हेही वाचा : महेंद्रसिंग धोनीचा खाकी वर्दीतील फोटो व्हायरल; नेटकरी म्हणाले “सिंघम ३ मध्ये…”
दरम्यान, याआधी दोन वर्षांपूर्वी धोनीने शेवटी केलेल्या पोस्टमध्येही त्याने शेतातील एक व्हिडीओ शेअर केला होता. हा व्हिडीओ धोनीच्या स्ट्रॉबेरीच्या शेतीचा होता. त्यात धोनी आपल्या शेतातील स्ट्रॉबेरी तोडून खाताना दिसत आहे.