किंग्ज इलेव्हन पंजाबचा क्रिकेटपटू परविंदर अवाना याला उत्तर प्रदेशमधील ग्रेटर नोएडामध्ये बेदम मारहाण करण्यात आली. भांडण सोडवण्याचा प्रयत्न केल्याच्या रागातून त्याला मारहाण करण्यात आली असून याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबचा शिलेदार ३१ वर्षीय परविंदर अवाना शुक्रवारी हरिद्वारवरुन परतत होता. ग्रेटर नोएडाजवळ एका बर्फाच्या फॅक्टरीमधून बर्फ घेण्यासाठी तो गेला. स्नायूला दुखापत झाल्याने त्याला बर्फ हवे होते आणि यासाठी तो फॅक्टरीत गेला होता. फॅक्टरीमध्ये कारमधून पाच जण आले. त्यांच्यासोबत एक महिलादेखील होती. त्यांचा फॅक्टरीतील एका कर्मचाऱ्यासोबत वाद झाला. महिलेसोबत आलेल्या पाच गुंडांनी लाकडी दांडक्याने त्या कर्मचाऱ्याला मारहाण केली. परविंदरने फॅक्टरीतील हा वाद सोडवण्याचा प्रयत्नदेखील केला. वाद थांबल्यानंतर शेवटी परविंदर तिथून निघून गेला. काही वेळाने मारहाण करणारे टोळकेही कारमधून पळाले.

महामार्गावरुन जात असताना परविंदरने त्या टोळक्याच्या कारला ओव्हरटेक केले आणि पुन्हा वादाची ठिणगी पडली. परविंदर आपला पाठलाग करत असल्याचे त्या टोळक्याला वाटले आणि त्यांनी परविंदरची गाडी अडवून त्याला बेदम मारहाण केली. याप्रकरणी परविंदरने तक्रार दाखल केली असून आम्ही पाच अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक जितेंद्र कुमार यांनी दिली. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे तपासाला सुरुवात केली आहे. या मारहाणीत परविंदरला किरकोळ दुखापत झाली आहे. आरोपींनी परविंदरच्या कारची काचदेखील फोडली. घटनास्थळावरुन पळ काढण्यापूर्वी त्यांनी मला ठार मारण्याची धमकीदेखील दिली असे परविंदरने म्हटले आहे.

परविंदर अवानाला मारहाण झाल्याची ही पहिली घटना नाही. यापूर्वी उत्तर प्रदेशमधील नोएडामध्ये एका वाहतूक पोलिसाने अवानाला मारहाण केली होती. क्षुल्लक वादावरुन पोलिसाने अवानाला मारहाण केली होती. याप्रकरणी परविंदरच्या तक्रारीनंतर संबंधीत पोलिसाला निलंबित करण्यात आले होते. परविंदर अवानाने २०१२ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. डिसेंबर २०१२ मध्ये इंग्लंडविरुद्धच्या टी-२० सामन्यात त्याची निवड करण्यात आली होती. २०१६ मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबकडून तो आयपीएलमध्ये खेळला होता. त्याने रणजीत दिल्लीचे प्रतिनिधित्व केले आहे.