सर्फराज खान सध्या फक्त २२ वर्षांचा आहे. मात्र आतापर्यंत त्याच्या करिअरमध्ये अनेक चढ-उतार आले आहेत. भारतीय संघाचा भविष्यातील खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात होतं. पण त्याच्या करिअरमध्ये ती संधी आलीच नाही. पण नुकतंच सर्फराज खानचं नाव पुन्हा एकदा चर्चेत आहेत. रणजी सामन्यात मुंबईकडून खेळताना सर्फराजने त्रिशतकी खेळी केली आणि पुन्हा एकदा सगळ्याचं लक्ष वेधून घेतलं. ही खेळी सर्फराजच्या करिअरधील महत्त्वाचा टप्पा ठरु शकतो असं अनेकांचं म्हणणं आहे.

“मला पुन्हा परत येऊन खूप चांगलं वाटत आहे. तसंच मुंबईच्या त्रिशतकी खेळीच्या क्लबमध्ये ज्यामध्ये सचिन तेंडुलकर, सुनील गावसकर, वसीम जाफर, रोहित शर्मा यांच्यासारखे खेळाडू आहेत त्यात आपलं नाव सामील झाल्याचाही खूप आनंद आहे,” असं सर्फराजने ESPNCricinfo शी बोलताना सांगितलं आहे.

“माझ्या फिटनेसमुळे २०१६ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघातून वगळण्यात आलं होतं. विराट कोहलीने तर मला स्पष्टपणे तुझ्या खेळीबाबत काही शंका नाही पण तुझा फिटनेस पुढच्या पायरीवर जाण्यापासून रोखत असल्याचं सांगितलं होतं. त्याने मला प्रामाणिकपणे माझं नेमकं काय स्थान आहे सांगितलं होतं,” असं सर्फराजने सांगितलं.

सर्फराजने सध्या आपल्या डाएटवर लक्ष केंद्रीत कऱण्यास सुरुवात केली आहे. आपण आपल्या ट्रेनिंग आणि डाएटकडे विशेष लक्ष देत असून याचा आपल्या खेळावर कशा पद्धतीने परिणाम होतोय हेदेखील पाहत असल्याचं तो सांगतो.

“आता फिट होणं गरजेचं आहे याची मला कल्पना आहे. त्यामुळे मी पूर्ण लक्ष वर्कआऊटकडे देत आहे. मी गोड खाणं सोडलं असून आता शिस्त लावली आहे. मला आता फिटनेसचं वेड लागलं आहे असं म्हणणार नाही, पण मी डाएटमध्ये काही बदल केले आहेत. मी जंक फूड खाणं पूर्णपणे बंद केलं आहे,” असं सर्फराज म्हणतो.

“माझा फिटनेस सुधारला म्हणून फक्त मला चांगलं वाटत आहे असं नाही तर यामुळे माझा खेळ सुधारला आहे. एक वेळ अशी होती जेव्हा मी खूप खायचो म्हणून माझे सहकारी मला पांडा म्हणून हाक मारायचे. आता ते मला माचो म्हणतात. खरं तर फार कमी लोकांना माझं टोपण नाव माहिती आहे,” असं सर्फराज सांगतो. यावेळी सर्फराजने जेव्हा आरसीबी संघाने आपल्याला संघातून वगळलं होतं तेव्हा फार वाईट वाटलं होतं अशी भावना बोलून दाखवली. सर्फराज आता किंग्ज इलेव्हन पंजाब संघाकडून खेळताना दिसणार आहे.