ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलने मानसिक तणावाखाली असल्यामुळे क्रिकेटमधून अनिश्चीत काळासाठी विश्रांती घेतली आहे. मॅक्सवेलच्या या निर्णयामुळे, खेळाडूंवर असलेला अतिक्रिकेटचा ताण हा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला. भारताचा माजी खेळाडू युवराज सिंहनेही भारतीय खेळाडू मानसिक तणावाखाली असल्याचं धक्कादायक विधान केलं आहे. तो टी-२० लिग मधील एका कार्यक्रमात पत्रकारांशी बोलत होता.

“आतापर्यंत खेळाडूंचं म्हणणं कोणीही ऐकून घेतलं नव्हतं, मात्र ते गरजेचं आहे. खेळाडूंसाठी एखादी संघटना अत्यंत गरजेची आहे. मॅक्सवेलला क्रिकेटमधून विश्रांती घ्यावीशी वाटली, कारण त्याला त्याच्यावर असलेल्या मानसिक तणावाची जाणीव होती. मात्र भारतीय खेळाडू असं करु शकत नाही, कारण त्यांना आपलं संघातलं स्थान गमावण्याची भीती असते. याच कारणासाठी भारतीय क्रिकेटमध्ये खेळाडूंची संघटना असणं गरजेचं आहे.” युवराज सिंहने आपलं मत मांडलं.

१५ नोव्हेंबरपासून अबु धाबी येथे सुरु होणाऱ्या टी-१० लिगमध्ये युवराज सिंह मराठा अरेबियन्स संघाकडून खेळणार आहे. याआधीही युवराजने कॅनडात पार पडलेल्या ग्लोबल टी-२० स्पर्धेत सहभाग घेतला होता.