सिडनीमधील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलिया दौऱयावर असलेल्या भारतीय संघाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. ब्रिस्बेन येथे होणाऱया दुसऱया कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाच्या सुरक्षेत कमालीची वाढ करण्यात आली असून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचेही(बीसीसीआय) संघाच्या सुरक्षा प्रणालीवर विशेष लक्ष आहे.
ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळाच्या वरिष्ठांसोबत आम्ही सतत संपर्कात असून तेथील स्थितीची वेळोवेळी आम्ही माहिती घेत आहोत. टीम इंडिया सध्या ब्रिस्बेनमध्ये असून तेथे सर्व काही ठीक आहे. संघाला कडक सुरक्षा व्यवस्था देण्यात आल्याचे बीसीसीआयचे सचिव संजय पटेल यांनी सांगितले. तसेच सिडनीमधील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियन क्रिकेट मंडळाने त्वरित आमच्याशी संपर्क साधून संघाच्या सुरक्षेत वाढ केल्याची माहिती दिली असल्याचेही पटेल पुढे म्हणाले.
सिडनीमध्ये एका माथेफिरू दहशतवाद्याने एका कॉफी शॉपमधील ग्राहकांना ओलीस धरून धुमाकूळ घातला आहे. स्थानिक वृत्तवाहिन्यांनी दाखविलेल्या वृत्तानुसार या दहशतवाद्याने अरेबिक शब्दांत काही संदेश लिहिलेला काळ्या रंगाचा झेंडा ओलीस ठेवलेल्या लोकांकडून खिडकीतून इतरांना दाखवायला लावला. सध्या सिडनी पोलिसांनी संपूर्ण परिसराला वेढा दिला असून, ओलीस ठेवलेल्या लोकांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. तीन नागरिक या इमारतीमधून बाहेर पडल्याची माहिती मिळाली आहे.