T20 WC 2021: भारतीय डॉक्टरने केले पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानवर यशस्वी उपचार; वाचा कोण आहेत साहीर सैनालाबदीन?

पाकिस्तानचा सलामीवीर मोहम्मद रिझवानने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्य फेरीत ५२ चेंडूत ६७ धावांची शानदार खेळी केली होती.

mohammaz-rizwan-indian-doctor-ICU
(फोटो सौजन्य – ट्विटर)

पाकिस्तानचा सलामीवीर मोहम्मद रिझवानने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्य फेरीत ५२ चेंडूत ६७ धावांची शानदार खेळी केली होती. पण या सामन्याच्या काही तास आधीपर्यंत तो आयसीयूमध्ये दाखल होता, असा खुलासा त्याच्याच संघाचे फलंदाजी सल्लागार मॅथ्यू हेडन यांनी केला होता. रिझवानवर आयसीयूमध्ये उपचार सुरू असताना एका भारतीय डॉक्टरने महत्त्वाची भूमिका बजावल्याचेही समोर येत आहे.

खलीज टाईम्सच्या वृत्तानुसार, मोहम्मद रिझवानवर दुबईतील मेडॉर हॉस्पिटलमध्ये भारतीय वंशाचे डॉक्टर साहीर सैनालाबदीन यांनी उपचार केले. रिझवान ज्या पद्धतीने बरा होऊन मैदानावर पोहोचला आणि आपल्या संघासाठी शानदार खेळ दाखवला, ते पाहून खुद्द डॉक्टरांनाही आश्चर्य वाटले होते. डॉक्टरांनी सांगितले की, “उपचारादरम्यान रिजवान सतत एकच गोष्ट सांगत होता की, मला खेळायचे आहे आणि मला टीमसोबत राहायचे आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्य फेरीत ५२ चेंडूत ६७ धावांची शानदार खेळी खेळण्यापूर्वी त्याला जवळपास ३० तास आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. मोहम्मद रिझवानला छातीत संसर्ग झाला होता.”

“९ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजता रिझवानला ताप आणि खोकल्यामुळे छातीत त्रास होत असल्याने रुग्णालयात आणण्यात आले. त्याला दुखणं असह्य होत होतं. चाचणीनंतर त्याला फुफ्फुसात गंभीर संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. त्यातून बरे होण्यासाठी साधारणपणे ५ ते ७ दिवस लागतात. सततच्या वेदना आणि त्रासामुळे त्याला आयसीयूमध्ये हलवण्यात आले. तो जवळपास ३५ तास आयसीयूमध्ये होता. पण तो खूप खंबीर आणि आत्मविश्वासात होता. त्याच्या मनात फक्त उपांत्य फेरीचा सामना होता. या महत्त्वाच्या सामन्यात त्याला काहीही करून खेळायचे होते. तो ज्या गतीने संसर्गातून सावरला, ते पाहून मलाही आश्चर्य वाटते,” असे डॉक्टरांनी सांगितले.

“त्याच्या हिमतीमुळे तो वेगाने रिकव्हर झाला. बुधवारी त्याच्या चाचण्या घेतल्या गेल्या तेव्हा त्याचा संसर्ग बऱ्यापैकी कमी झाला होता. त्यामुळे सामन्याच्या एक दिवस आधी बुधवारी दुपारी त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला,” असं डॉक्टर म्हणाले. दरम्यान, भारतीय वंशाचे डॉक्टर साहीर यांना रिझवानने ऑटोग्राफ दिलेला पाकिस्तान क्रिकेट संघाचा टी-शर्टही भेट दिला.

मोहम्मद रिझवानने कर्णधार बाबर आझमसह डावाला सुरुवात केली. त्याने ५२ चेंडूत ३ चौकार आणि ४ षटकारांसह ६७ धावांची शानदार खेळी केली. १८व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर तो बाद झाला. त्याच्या संघासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू रिझवान होता.

कोण आहेत साहीर सैनालाबदीन?

साहीर सैनालाबदीन मेडॉर हॉस्पिटलमधील पल्मोनोलॉजिस्ट आहेत. त्यांनी रिझवानवर उपचार केले. तसेच रिझवान ज्या वेगाने संसर्गातून बरा झाला, ते पाहून त्यांनी आश्चर्य व्यक्त केलंय.

हेही वाचा – कशासाठी देशासाठी… सकाळी ICU मधून डिस्चार्ज मिळाला अन् संध्याकाळी तो देशासाठी सर्वाधिक धावा करणारा ठरला

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Indian doctor saheer sainalabdeen helped pakistani cricketer mohammad rizwan to recover in time from chest infection hrc

Next Story
विजयी भव !
ताज्या बातम्या