Indian Cricket Fan Chants Trophy Chor In Front Of Mohsin naqvi: महिला आशिया चषक २०२६ स्पर्धेतील अंतिम सामना भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना भारतीय संघाने १८३ धावांचा डोंगर उभारला होता. या धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेचा डाव अवघ्या १११ धावांवर आटोपला. यासह भारतीय संघाने हा सामना ७२ धावांनी आपल्या नावावर केला. भारताने विक्रमी आठव्यांदा आशिया चषक स्पर्धेच्या जेतेपदाची ट्रॉफी उंचावली. पण या विजयानंतर भारतीय खेळाडूंनी मोहसीन नक्वींच्या हातून ट्रॉफी घेण्यास नकार दिला. दरम्यान मोहसीन नक्वी मैदानात येताच क्रिकेट चाहत्यांनी दिलेल्या घोषणेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात झालेल्या आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाने पाकिस्तानला पराभूत करून जेतेपदाचा मान पटकावला होता. त्यावेळीही ट्रॉफी देण्यासाठी मोहसीन नक्वी स्टेजवर आले होते. पण, भारतीय खेळाडू ट्रॉफी घेण्यासाठी स्टेजवर गेलेच नव्हते. त्यामुळे मोहसीन नक्वी बराच वेळ ट्रॉफी घेऊन उभे होते. पण भारतीय खेळाडू ट्रॉफी न घेताच निघून गेले. यावेळीही विजेत्या संघाला मोहसीन नक्वी ट्रॉफी देणार, याची कल्पना भारतीय संघाला आधीपासूनच होती. त्यामुळे भारतीय खेळाडू ट्रॉफी घेण्यासाठी गेलेच नाही.
क्रिकेट चाहत्यांकडून ट्रॉफी चोरच्या घोषणा…
सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय, या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की मोहसीन नक्वी ट्रॉफी देण्यासाठी मैदानात येताच ‘ट्रॉफी चोर, ट्रॉफी चोर…’, अशा घोषणा दिल्या. या घोषणेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. पण हा व्हिडीओ खरा आहे की खोटा याबाबत कुठलीही माहिती समोर आलेली नाही. गेल्यावेळी देखील मोहसीन नक्वी ट्रॉफी देण्यासाठी स्टेजवर आले होते. पण भारतीय खेळाडूंनी ट्रॉफी घेण्यास नकार दिला होता. त्यामुळे बराच वेळानंतर मोहसीन नक्वी ट्रॉफी घेऊन निघून गेले होते. त्यानंतर भारतीय खेळाडूंनी ट्रॉफीशिवाय सेलिब्रेशन करून, पाकिस्तानला ट्रोल केलं होतं. पण यावेळी भारतीय महिला संघातील खेळाडू थेट मैदानाबाहेर निघून गेले.
भारतीय संघाचा विजय
या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने २० षटकअखेर ५ गडी बाद १८३ धावा केल्या. भारतीय संघाकडून स्मृती मानधनाने ५९ आणि शफाली वर्माने ६८ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या श्रीलंकेचा डाव अवघ्या १११ धावांवर आटोपला. यासह भारतीय संघाने हा सामना ७२ धावांनी आपल्या नावावर केला.
