Champions Trophy 2025 in 9 Languages : सर्व क्रिकेटप्रेमी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या सुरुवातीची आतुरतेने वाट पाहत आहेत. मिनी वर्ल्ड कप म्हणून ओळखली जाणारी ही स्पर्धा यावेळी पाकिस्तानच्या यजमानपदाखाली खेळवली जात आहे. १९९६ नंतर पहिल्यांदाच पाकिस्तानला आयसीसी स्पर्धेचे आयोजन करण्याची संधी मिळाली आहे. दरम्यान, आयसीसीने बक्षीस रकमेची घोषणा करतानाच, या सामन्यांच्या थेट प्रक्षेपणाची सर्व माहिती शेअर करून भारतीय चाहत्यांना एक मोठी भेट दिली.
या स्पर्धेत भारतीय संघ त्यांचे सामने दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये खेळेल. चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा पहिला सामना १९ फेब्रुवारी रोजी खेळला जाईल, तर अंतिम सामना ९ मार्च रोजी होईल. यामध्ये सहभागी होणाऱ्या ८ संघांना प्रत्येकी ४ संघांच्या दोन वेगवेगळ्या गटात विभागण्यात आले आहे. आयसीसीने जाहीर केलेल्या लाईव्ह टेलीकास्टच्या माहितीत भारतीय चाहत्यांना मोठी भेट देण्यात आली आहे. पहिल्यांदाच, भारतीय चाहत्यांना ९ वेगवेगळ्या भाषांमध्ये आंतरराष्ट्रीय सामन्यांचे थेट प्रक्षेपण पाहता येईल.
भारतीय चाहत्यांना ९ वेगवेगळ्या भाषांमध्ये सामन्यांचा आनंद घेता येणार –
भारतात, सामन्यांचे थेट प्रक्षेपण स्पोर्ट्स १८ आणि स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर केले जाईल. याशिवाय, सामन्यांचे ऑनलाइन लाईव्ह स्ट्रीमिंग जिओ हॉटस्टार अॅपवर केले जाईल. ज्यामध्ये चाहते इंग्रजी, हिंदी, मराठी, हरियाणवी, बंगाली, भोजपुरी, तमिळ, तेलगू आणि कन्नड या ९ भाषांमध्ये समालोचनाचा आनंद घेऊ शकतील. याशिवाय, चाहत्यांना मल्टी-कॅम फीडचा आनंद घेता येईल.
चॅम्पियन्स ट्रॉफी विजेत्या संघाला मिळणार सुमारे २० कोटी रुपये –
२०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी, आयसीसीने बक्षीस रकमेच्या बाबतीतही आपला खजिना उघडला आहे, जो गेल्या वेळेच्या तुलनेत ५३ टक्क्यांनी वाढला आहे. २०२५ ची आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणाऱ्या संघाला सुमारे २० कोटी रुपये मिळतील, तर उपविजेत्या संघालाही सुमारे १० कोटी रुपये मिळतील. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व संघांना किमान १ कोटी रुपये मिळतील.