#MeToo: मुंबईतील हॉटेलमध्ये अर्जुन रणतुंगाने आपल्याला पकडले होते, महिला कर्मचाऱ्याचा आरोप

हवाई क्षेत्रात काम करणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्याने श्रीलंकेचा माजी कर्णधार अर्जुन रणतुंगावर लैंगिकसुखासाठी छळ केल्याचा आरोप केला आहे.

माजी कसोटीपटू अर्जुन रणतुंगा

#MeToo मोहिमेतंर्गत वेगवेगळया क्षेत्रातील महिला त्यांच्याबरोबर झालेल्या लैंगिक जबरदस्तीच्या घटनांना वाचा फोडत असताना आता आणखी एक असेच धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. भारतात हवाई क्षेत्रात काम करणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्याने श्रीलंकेचा माजी कर्णधार अर्जुन रणतुंगावर लैंगिकसुखासाठी छळ केल्याचा आरोप केला आहे.

काही वर्षांपूर्वी श्रीलंकेचा संघ भारत दौऱ्यावर असताना मुंबईतील हॉटेलमध्ये ही घटना घडली होती असा दावा महिलेने केला आहे. या महिलेने फेसबुकवर सविस्तर पोस्ट लिहून ही घटना कशी घडली त्याची माहिती दिली आहे तसेच तिला अन्य लोकांनी लैंगिक सुखासाठी कसा त्रास दिला त्याची माहिती सुद्धा तिने दिली आहे.

रणतुंगाने माझी कंबर पकडल्यानंतर मी कशीबशी स्वत:ची सुटका करुन घेतली व त्या रुममधून बाहेर पडले. मी पळत रिसेप्शन काऊंटरवर आले व घडलेल्या प्रकाराबाबत सांगितले. त्यावेळी हॉटेल स्टाफने ती तुमची खासगी बाब आहे असे सांगून हात झटकल्याचे या महिलेने सांगितले. अर्जुन रणतुंगा सध्याच्या श्रीलंकेतील सरकारमध्ये पेट्रोलियम खात्याचा मंत्री आहे.

काही वर्षांपूर्वी श्रीलंका संघ भारत दौऱ्यावर आला होता. त्यावेळी जुहूच्या सेंटॉर हॉटेलमधल्या लिफ्टमधून जाणाऱ्या भारतीय आणि श्रीलंकन क्रिकेटपटूंवर माझ्या सहकाऱ्याचे लक्ष गेले. त्यावेळी त्यांची सही घेण्यासाठी त्यांच्या रुममध्ये जाण्याचा आम्ही निर्णय घेतला. आम्ही त्यांच्या रुममध्ये गेलो त्यावेळी त्यांनी आम्हाला दारु पिण्याची ऑफर केली. पण मी त्यांना नकार दिला. मी पाण्याची बाटली सोबत आणली होती. त्या रुममध्ये ते सात जण तर आम्ही दोघी होतो. त्यांनी दरवाजा बंद केल्यानंतर माझ्या मनात संशयाची पाल चुकचुकली व मला भिती वाटू लागली. आपण आपल्या रुममध्ये परत जाऊया असे मी माझ्या मैत्रिणीला सांगितले. पण ती त्या क्रिकेटपटूंच्या प्रेमामध्ये हरवून गेली होती. तिला स्विमिंग पूलच्या बाजूला फेरफटका मारण्यासाठी जायचे होते. त्यावेळी संध्याकाळचे सात वाजले होते. पूलकडे कोणीही नव्हते. भारतीय क्रिकेटपटूही दिसत नव्हते.

तितक्यात रणतुंगाने मागून माझी कंबर पकडली. त्याचे हात माझ्या छातीपर्यंत पोहोचले होते. मी आरडा-ओरडा सुरु केला, त्याच्या पायावर लाथा मारत होते. तुझा पासपोर्ट रद्द होईल, पोलिसांकडे जाईन, तुला गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी त्याला धमकी देत होते. मी कशीबशी स्वत:ची सुटका करुन घेतली व पळत रिसेप्शन काऊंटरवर आले व घडलेल्या प्रकाराबाबत सांगितले. त्यावेळी हॉटेल स्टाफने ती तुमची खासगी बाब आहे असे सांगून हात झटकल्याचे या महिलेने सांगितले.

 

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Indian flight attendant claims arjuna ranatunga sexually harassed her