scorecardresearch

मैत्रीपूर्ण सामन्यांसाठी भारतीय फुटबॉल संघ घोषित; सात नवीन चेहऱ्यांचा समावेश; मुंबईकर भेकेचीही निवड

भारताने महिनाअखेरीस बहरिन आणि बेलारूस या संघांविरुद्ध होणाऱ्या मैत्रीपूर्ण आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामन्यांसाठी सोमवारी २५ सदस्यीय संघाची घोषणा केली.

राहुल भेके

पीटीआय : भारताने महिनाअखेरीस बहरिन आणि बेलारूस या संघांविरुद्ध होणाऱ्या मैत्रीपूर्ण आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामन्यांसाठी सोमवारी २५ सदस्यीय संघाची घोषणा केली. या संघात सात नवख्या खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. मुंबईकर बचावपटू राहुल भेकेचीही संघात निवड करण्यात आली आहे.

भारताच्या राष्ट्रीय पुरुष संघाचे प्रशिक्षक इगॉर स्टीमॅच यांनी बहरिन येथे २३ आणि २६ मार्चला खेळवण्यात येणाऱ्या दोन सामान्यांसाठी प्रभसुखन गिल, होर्मिपम रुइवा, अन्वर अली, रोशन सिंग, वीपी सुहैर, दानिश फारूक आणि अनिकेत जाधव नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. ‘‘आम्ही बहरिन आणि बेलारूस या संघांविरुद्ध खेळणार आहोत. क्रमवारीत ते आमच्याहून वरच्या स्थानांवर आहेत. मात्र, मैदानात चांगली कामगिरी करण्याचा आम्हाला विश्वास आहे,’’ असे स्टीमॅच म्हणाले.

‘‘बहरिन येथे होणाऱ्या सामान्यांमध्ये आम्हाला आमची प्रगती कळेल. आम्ही काही युवा खेळाडूंना संधी देत आहोत. या खेळाडूंनी इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) यंदाच्या हंगामात चांगली कामगिरी केली,’’ असेही स्टीमॅच यांनी सांगितले. हे सामने २०२३च्या ‘एएफसी’ आशिया चषकासाठी आठ जूनपासून कोलकातामध्ये होणाऱ्या पात्रता सामान्यांच्या शेवटच्या सत्राच्या तयारीचा भाग आहेत. पात्रता फेरीसाठी भारताला ‘ड’ गटात हॉंगकॉंग, अफगाणिस्तान आणि कंबोडिया यांच्यासोबत स्थान मिळाले आहे.

भारतीय संघ

गोलरक्षक : गुरप्रीत सिंग संधू, अमिरदर सिंग, प्रभसुखन गिल

बचावपटू : प्रीतम कोटल, सेरीटन फर्नाडीस, राहुल भेके, होर्मिपम रुइवा, संदेश झिंगन, अन्वर अली, चिंगलेनसाना सिंग, सुभाशीष बोस, आकाश मिश्रा, रोशन सिंग

मध्यरक्षक : बिपिन सिंग, अनिरुद्ध थापा, प्रणय हलदर, जिकसन सिंग, ब्रेंडन फर्नाडीस, वीपी सुहैर, दानिश फारूक, यासिर मोहम्मद, अनिकेत जाधव

आघाडीपटू : मनवीर सिंग, लिस्टन कोलाको, रहीम अली

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Indian football team announced friendly matches including seven new faces ysh