Gautam Gambhir On Suryakumar Yadav: गौतम गंभीर हा तिन्ही फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक आहे. गौतम गंभीरच्या मार्गदर्शनाखाली खेळताना भारतीय संघाला वनडे आणि कसोटी क्रिकेटमध्ये आपली छाप सोडता आलेली नाही. पण भारताने टी-२० क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केली आहे. कसोटी आणि वनडे क्रिकेटमध्ये भारतीय संघाने अनेक महत्वाच्या मालिका गमावल्या आहेत. त्यामुळे गौतम गंभीरवर जोरदार टीका देखील केली गेली. पण टी-२० क्रिकेटमध्ये भारताने अनेक मोठे रेकॉर्ड मोडून काढले. सध्या भारतात टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेचा थरार सुरू आहे. या स्पर्धेत भारतीय संघाला जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानलं जात आहे. भारतीय संघाच्या या दमदार कामगिरीचं श्रेय गौतम गंभीरने सूर्यकुमार यादवला दिलं आहे. यासह त्याने सूर्यकुमार यादवचं कौतुकही केलं.

गौतम गंभीरकडून सूर्यकुमार यादवचं कौतुक

स्टार स्पोर्ट्सवर बोलताना गौतम गंभीरने सूर्यकुमार यादवचं तोंडभरून कौतुक केलं. गौतम गंभीर म्हणाला, “सूर्याने टी-२० फॉरमॅटमध्ये माझं काम खूप सोपं केलं आहे. तो एक उत्तम कर्णधार आहे. एक प्रशिक्षक म्हणून डोक्यात बऱ्याच गोष्टी सुरू असतात. पण जेव्हा आपल्याला माहीत असतं की, मैदानावर असलेला कर्णधार संघातील वातावरण सांभाळून घेईल, तेव्हा मोठा दिलासा मिळतो. कुठल्याही प्रशिक्षकासाठी हे एका स्वप्नासारखे असते.”

सूर्यकुमार यादवने कर्णधार म्हणून दमदार कामगिरी केली आहे. तो गोलंदाजीत योग्यवेळी योग्य बदल करतो. यासह संघाला गरज असताना शेवटपर्यंत मैदानावर टीकून राहतो. टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेत भारतीय संघाचा पहिला सामना अमेरिकेविरूद्ध पार पडला. या सामन्यात भारतीय फलंदाज पहिल्या डावात फलंदाजीसाठी मैदानात उतरले होते. या सामन्यात भारतीय संघाला एकापाठोपाठ एक मोठे धक्के बसले होते. कमी धावसंख्येवर संघातील प्रमुख फलंदाज माघारी परतले होते. पण सूर्यकुमार यादवने शेवटपर्यंत किल्ला लढवला. सूर्यकुमार यादवने नाबाद ८४ धावांची खेळी केली. हे अमेरिकेविरूद्ध खेळताना सूर्यकुमार यादवचं दुसरं अर्धशतक ठरलं. याआधी २०२४ मध्ये झालेल्या टी-२० वर्ल्डकप स्पर्धेतही सूर्यकुमार यादवने दमदार अर्धशतकी खेळी केली होती.

काही महिन्यांपूर्वीच सूर्यकुमार यादवच्या फलंदाजीवर प्रश्न उपस्थित केले जात होते. पण संघाला गरज असताना त्याने महत्वपूर्ण खेळी केली. २०२६ मध्ये फलंदाजी करताना त्याने आतापर्यंत ४ अर्धशतकं झळकावली आहेत. फलंदाजीत अशीच कामगिरी सुरू ठेवली, तर भारतीय फलंदाजी आणखी मजबूत होईल.