FIH Pro League 2026 India vs Pakistan: भारताच्या हॉकी संघाने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवत आपला अपराजित राहण्याचा विक्रम कायम राखला आहे. लंडन येथील ली व्हॅली हॉकी अँड टेनिस सेंटरमध्ये २६ जून रोजी खेळल्या गेलेल्या २०२५-२६ एफआयएच (FIH) प्रो लीगच्या आपल्या उपांत्य सामन्यात संघाने ७-१ असा विजय मिळवला आणि गेल्या एका दशकापासून सुरू असलेली विजयाची मालिका अबाधित ठेवली. मंगळवारी, २३ जून रोजी याच मैदानावर ४-३ असा विजय मिळवल्यानंतर, भारतीय संघाने आपल्या कट्टर प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध अवघ्या चार दिवसांत हा दुसरा विजय नोंदवला.

पाकिस्तानने या सामन्यात १३ व्या मिनिटालाच पहिला गोल करून भारतावर १-० अशी आघाडी घेतली. पाकिस्तानसाठी अबू महमूदने पहिला गोल केला, मात्र त्यानंतर भारतीय खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली आणि उर्वरित सामन्यात पाकिस्तानला एकही गोल करू दिला नाही. दुसऱ्या सत्रात सुखजीत सिंगने २० व्या मिनिटाला गोल करत भारताला सामन्यात बरोबरीत आणलं. त्यानंतर भारतीय संघाने अधिक आक्रमक खेळ केला; २६ व्या मिनिटाला कर्णधार हरमनप्रीत सिंगने पेनल्टी कॉर्नरद्वारे शानदार गोल करत संघाला सामन्यात २-१ अशी आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या सत्राच्या अखेरीस भारताकडे २-१ अशी आघाडी होती.

दुसऱ्या सत्रात एक दुर्दैवी घटना घडली, ज्यामध्ये पाकिस्तानी खेळाडू अहमद नदीमच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली; वैद्यकीय उपचारानंतर त्याला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर नेण्यात आलं. त्यानंतर, तिसऱ्या सत्रात हार्दिक सिंग (३४ व्या मिनिटाला), जुगराज सिंग (३५ व्या मिनिटाला), अभिषेक (४१ व्या मिनिटाला) आणि राजकुमार पाल (४४ व्या मिनिटाला) यांनी गोल केले; तर अंतिम सत्रात दिलप्रीत सिंगने केलेला गोल (५४ व्या मिनिटाला) म्हणजे ‘सोने पे सुहागा’ ठरला आणि भारताचा ७-१ असा मोठा विजय निश्चित झाला.

भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळल्या गेलेल्या गेल्या १९ सामन्यांपैकी भारतीय संघाने १७ सामने जिंकले आहेत, तर पाकिस्तानला एकही विजय मिळवता आलेला नाही. भारताच्या या विजयाच्या मालिकेची सुरुवात १२ एप्रिल २०१६ रोजी (३,२७८ दिवसांपूर्वी) क्वालालंपूरमधील ‘सुलतान अझलन शाह’ स्पर्धेतील एका सामन्याने झाली होती. ऑलिम्पिकमध्ये आठ वेळा सुवर्णपदक जिंकणाऱ्या भारतीय संघाला आपल्या कट्टर प्रतिस्पर्ध्यांकडून शेवटचा पराभव २०१६ मध्ये गुवाहाटी येथे झालेल्या ‘दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धां’मध्ये (South Asian Games) पत्करावा लागला होता.