वृत्तसंस्था, वेव्रे (बेल्जियम) : भारतीय पुरुष हॉकी संघाला विश्वचषक स्पर्धेत अखेर आठव्या स्थानावर समाधान मानावे लागले. वर्गीकरण सामन्यात नियोजित वेळेतील ३-३ बरोबरीनंतर भारताला शूटआऊटमध्ये बेल्जियमविरुद्ध ३-४ असा पराभव पत्करावा लागला. पाच दशकांपासूनची विश्वचषक पदकाची प्रतीक्षा संपवण्याचे ध्येय बाळगून मैदानात उतरलेल्या भारतीय पुरुष हॉकी संघासाठी ही स्पर्धा निराशाजनक ठरली. त्यांना दुसर्या फेरीतील तीनही सामन्यांत हार पत्करावी लागली.
जागतिक क्रमवारीत दुसर्या स्थानावर असलेल्या बेल्जियमला भारताने झुंज दिली, पण ती अपयशी ठरली. बेल्जियमने नियोजित वेळेत अखेरच्या मिनिटापर्यंत ३-२ अशी आघाडी कायम राखली होती. सामना संपण्यासाठी २६ सेकंद शिल्लक असताना मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर कर्णधार हरमनप्रीत सिंग याने गोल करून सामना ३-३ असा बरोबरीत आणला. हरमनप्रीतचा हा स्पर्धेतील आठवा गोल होता.
निकाल लावण्यासाठी झालेल्या झालेल्या शूटआऊटमध्ये भारताच्या शिलानंद लाक्रा, दिलप्रीत सिंग आणि अभिषेक यांनी गोल केले. मात्र, ते भारताला विजय मिळवून देऊ शकले नाही. बेल्जियमकडून टॉम ब्रून, आर्थर डी स्लोव्हर, ॲलेक्झांडर हेंड्रिक्स, रोमन डुवेकोट यांनी गोल केले. भारताच्या सुखजीत सिंग आणि शमशेर सिंग, तर बेल्जियमच्या व्हिक्टर फोरबर्टची संधी हुकली. निर्धारित वेळेत भारताकडून हरमनप्रीतने दोन, तर अभिषेकने एक गोल केला. बेल्जियमकडून डुवेकोट, ह्युगो लॅबुशरे आणि निकोलस डी केर्पेल यांनी गोल नोंदवले.
वैयक्तिक कामगिरीला महत्त्व नाही. तुम्ही संघ म्हणून जिंकता आणि संघ म्हणूनच हरता. आम्ही सर्वांनी मिळून अपयशाची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. या स्पर्धेत आम्हाला बर्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. विशेषत: बचावात सुधारणा गरजेची असल्याचे स्पष्टपणे जाणवले. बचावातील चुकाच सर्वांत महागात पडतात. आमच्यासाठी ही चिंतेची बाब असून आम्ही त्यावर मेहनत घेणे आवश्यक आहे. – हरमनप्रीत सिंग, भारताचा कर्णधार
