पीटीआय, नवी दिल्ली : भारतीय हॉकी संघाचा अनुभवी मध्यरक्षक मनप्रीत सिंगसह तीन खेळाडूंना आगामी ‘एफआयएच’ प्रो लीगसाठीच्या संभाव्य खेळाडूंच्या यादीतून वगळण्याचा निर्णय गंभीर शिस्तभंगाच्या कारणामुळे घेण्यात आल्याचे समोर आले आहे. डिसेंबरमध्ये झालेल्या दक्षिण आफ्रिका दौर्यातील गैरवर्तनामुळे हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
प्रो लीगमध्ये भारताचा पहिला सामना ११ फेब्रुवारी रोजी बेल्जियमविरुद्ध होणार आहे. त्याआधी १ ते ७ फेब्रुवारीदरम्यान होणार्या राष्ट्रीय शिबिरासाठी संभाव्य ३३ खेळाडूंच्या यादीत मनप्रीत, दिलप्रीत सिंग आणि गोलरक्षक कृष्ण बहादूर पाठक यांना स्थान देण्यात आलेले नाही.
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेतील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय हॉकी संघाला दोन सामन्यांत पराभव पत्करावा लागला, तर एक सामना अनिर्णित राहिला होता. या दौर्यादरम्यान एका खेळाडूच्या शिस्तभंगाचा गंभीर प्रकार उघडकीस आला होता. संबंधित खेळाडू संघाच्या बैठकीस अनुपस्थित राहिला. मनप्रीत, दिलप्रीत आणि पाठक यांनी त्याला प्रतिबंधित पदार्थ असलेली ‘च्युइंग गम’ दिली होती, ज्यामुळे त्याची प्रकृती खालावली आणि तो बेशुद्ध झाला असे चौकशीत समोर आल्याचे आता सूत्रांनी सांगितले आहे.
त्या खेळाडूला रात्रभर वैद्यकीय देखरेखीखाली ठेवावे लागले, तसेच दुसर्या दिवशीही तो संघ बैठकीस उपस्थित राहू शकला नाही. या घटनेनंतर संबंधित खेळाडूंनी माफी मागितली असली तरी संघ व्यवस्थापनाने कठोर कारवाई करताना त्यांना संभाव्य यादीतून वगळण्याचा निर्णय घेतला.

