लागोपाठ दोन सामने जिंकल्यानंतर आत्मविश्वास उंचावलेला भारतीय हॉकी संघ रविवारी न्यूझीलंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात मालिका विजयासाठी प्रयत्न करण्यासाठी सज्ज झाला आहे.

भारताने पहिला सामना गमावल्यानंतर लागोपाठ दोन सामने जिंकले आहेत. दुसऱ्या व तिसऱ्या सामन्यात भारताने आक्रमक खेळ करीत विजय मिळविला होता. तसाच खेळ ते चौथ्या सामन्यात करण्यासाठी उत्सुक झाले आहेत. रमणदीपसिंग, निक्कीन थिमय्या, एस. व्ही. सुनील व आकाशदीपसिंग यांच्यावर त्यांची मुख्य मदार आहे. कर्णधार सरदारसिंग याची मदत त्यांना मिळणार आहे.

तिसऱ्या सामन्यात शेवटच्या दीड मिनिटात धरमवीरसिंग याने भारताकडून गोल केला होता. त्याच्याबरोबरच एस. के. उथप्पा, देविंदर वाल्मीकी व चिंगलेनासाना सिंग यांच्याकडूनही भारतास चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.

न्यूझीलंडचा संघ लागोपाठ तिसरा पराभव टाळण्यासाठी चौथा सामना जिंकून मालिकेत २-२ अशी बरोबरी साधण्यासाठी ते खेळतील असा अंदाज आहे.

भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रोलॅन्ट ओल्टमन्स यांनी सांगितले की, ‘‘लागोपाठ दोन सामने जिंकल्यामुळे आमच्या खेळाडूंचे मनोधैर्य उंचावले आहे. शेवटच्या सामन्यात मालिका विजयासाठीच ते खेळणार आहेत. पहिल्या सामन्याच्या तुलनेत गेल्या दोन सामन्यांमध्ये आमच्या खेळाडूंच्या कामगिरीत लक्षणीय सुधारणा झाली आहे. बचावफळीतील कामगिरीही भक्कम होऊ लागली आहे. ही फळीच आमचा आधारस्तंभ झाली आहे.’’

या सामन्याबाबत सरदार म्हणाला की, ‘‘पहिल्या सामन्यात आम्हाला अपेक्षेइतका सूर सापडला नव्हता. आता मात्र आमच्या खेळात खूप सकारात्मक पवित्रा आला आहे. आमच्यावर कोणतेही दडपण नाही. सर्वच आघाडय़ांवर आमची प्रगती झाली आहे.’’