Asian Games 2018 : आशियाई क्रीडा स्पर्धेत आज भारताने इंडोनेशियाविरुद्ध १७-० असा धडाकेबाज विजय मिळवला. भारतासाठी हा विजय फार खास ठरला. आशियाई क्रीडा स्पर्धांमधील हा भारताचा सर्वात मोठ्या फरकाचा विजय ठरला. भारतीय संघाकडून एकूण १७ गोल करण्यात आले. मात्र इंडोनेशियाला एकही गोल करता आला नाही. सामन्यावर भारताने पूर्ण वर्चस्व राखले.

भारतीय संघाने सामना सुरु झाल्यापासूनच इंडोनेशियाच्या संघावर दबाव ठेवला होता. भारताकडून सतत होणारी आक्रमणे इंडोनेशियाला परतवता आली नाही. सामन्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या मिनिटाला गोल करून रुपिंदरने भारताला २-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर लगेच दिलप्रीतने ६ व्या आणि ९ व्या मिनिटाला गोल करत ४-०अशी आघाडी वाढवली. त्याने सामन्याच्या ३२व्या मिनिटालाही एक गोल केला. या दरम्यान सिम्रनजीतने १३व्या, ३८व्या आणि ५३व्या मिनिटाला तर मनदीपने २९व्या, ४४व्या आणि ४९व्या मिनिटाला गोल केला. आकाशदीपने १०व्या आणि ४४व्या मिनिटाला तर सुनील (२५), विवेक (२६), अमित (५४), हरमनप्रीत (३१) यांनी १-१ गोल केला.