जागतिक सांघिक बुद्धिबळ स्पर्धा

चारही पटांवर अप्रतिम कामगिरी करणाऱ्या भारताच्या बुद्धिबळ संघाने सहाव्या फेरीत यजमान कझाकस्तानचा ३.५-०.५ असा पराभव करत जागतिक सांघिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत नऊ गुणांसह दुसरे स्थान पटकावले आहे.

अव्वल पटावर बी. अधिबान याला रिनात जुमाबायेव्ह याच्याविरुद्धचा डाव बरोबरीत सोडवावा लागला. त्यानंतर कृष्णन शशीकिरण, सूर्यशेखर गांगुली आणि एसपी. सेतूरामन यांनी पुढील तिन्ही पटांवर विजय मिळवत भारताच्या पदकाच्या आशा पल्लवीत केल्या आहेत.

शशीकिरणने अनुआर अस्मागामबेटोव्ह याला पराभूत केले. त्यानंतर गांगुलीने मूर्तास काझगालेयेव्ह याच्याविरुद्ध सरशी साधली. सेतूरामनने डेनिस माखनेव्हला हरवत भारताला सहज विजय मिळवून दिला.

महिला चीनकडून पराभूत

महिलांच्या सांघिक गटात, भारताला चीनकडून १.५-२.५ असा पराभव पत्करावा लागला. ईशा करवडे हिने टॅन झोंगयी हिच्याविरुद्धचा डाव बरोबरीत सोडवल्यानंतर सौम्या स्वामीनाथन आणि पद्मिनी राऊत यांनीही आपल्यापेक्षा क्रमवारीत वरचढ असलेल्या शेन यांग आणि हुआंग किआन यांना बरोबरीत रोखले. मात्र अखेरच्या पटावर भक्ती कुलकर्णी हिला लेई टिंगजाय हिच्याकडून हार पत्करावी लागल्याने भारताला पराभवाचा सामना करावा लागला. भारतीय महिलांचा हा या स्पर्धेतील दुसरा पराभव ठरला. स्पर्धेच्या तीन फेऱ्या शिल्लक असून चीनने १२ गुणांसह अव्वल स्थान पटकावले असून भारताची ९ गुणांसह पाचव्या क्रमांकावर घसरण झाली आहे.