Oman Cricket Team Appointed indian origin Vinayak Shukla As Captain: भारतीय वंशाचे क्रिकेटपटू सध्या जागतिक क्रिकेटमध्ये धुमाकूळ घालत आहेत. आयर्लंडविरूद्ध मालिकेत राजस्थानच्या जय मुंद्राने भारताविरूद्ध पदार्पणाच्या मालिकेत उत्कृष्ट कामगिरी करत आपली छाप पाडली. याशिवाय भारतीय वंशाचा असलेल्या निखिल चौधरीने ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. या दोन खेळाडूंबरोबरच आता मूळचा कानपूरचा असलेल्या विनायक शुक्ला याला ओमान क्रिकेट संघाचं कर्णधारपद देण्यात आलं आहे.

विनायक शुक्लाची ओमानच्या राष्ट्रीय संघाच्या नवीन कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातील कानपूरचा रहिवासी असलेला हे यष्टिरक्षक-फलंदाज ओमान क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून जतिंदर सिंग याची जागा घेईल. ओमान क्रिकेट बोर्डाने सोमवारी (६ जुलै २०२६) आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून ही बातमी जाहीर केली.

विनायकच्या कर्णधारपदाच्या नियुक्तीची घोषणा करताना बोर्डाने म्हटलं, “ओमान क्रिकेट अभिमानाने विनायक शुक्ला याची ओमान पुरुष क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून घोषणा करत आहे. संघाच्या सातत्यपूर्ण प्रगतीत आणि यशात महत्त्वाची भूमिका बजावल्यानंतर, विनायक आता राष्ट्रीय संघाचं नेतृत्व करून एका नवीन पर्वाची सुरुवात करणार आहे.”

विनायक शुक्लाने १४ डिसेंबर २०२४ ला कतारविरुद्ध टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर, १० फेब्रुवारी २०२५ रोजी त्याने नामिबियाविरुद्ध एकदिवसीय (ODI) क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. संघाचं कर्णधारपद स्वीकारण्यापूर्वी, विनायकने उपकर्णधार म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली होती. याव्यतिरिक्त, जतिंदर सिंग याच्या अनुपस्थितीत त्याने आशिया चषक आणि टी-२० विश्वचषकात ओमानचं प्रतिनिधित्व केलं.

कोण आहे विनायक शुक्ला?

विनायक शुक्लाहा मूळचा उत्तर प्रदेश कानपूर येथी आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये दीर्घकाळ खेळूनही त्याला भारतीय संघाकडून खेळण्याची संधी मिळाली नाही. त्यानंतर, सततच्या अपयशाच्या काळात, त्याच्या प्रशिक्षकांनी त्याला चांगल्या संधींच्या शोधात ओमानला जाण्याचा सल्ला दिला. प्रशिक्षकांचा सल्ला मानून विनायक २०२१ मध्ये ओमानला गेला. स्वतःचा उदरनिर्वाह आणि खर्च भागवण्यासाठी विनायकने ‘नॅशनल मेटल कॅन्स’ (National Metal Cans) या कंपनीत काम करण्यास सुरुवात केली. तिथे त्याला कंपनीच्या ‘ओमान स्टॅनियन्स’ (Oman Stannians) या संघाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली.

यानंतर २०२३ मध्ये त्याची ‘ओमान अ’ (Oman A) संघासाठी निवड झाली. २०२४ मध्ये ओमानच्या राष्ट्रीय संघासोबतचा त्याचा प्रवास सुरू झाला आणि आज त्याच्या कारकिर्दीतील कर्णधारपदाचा एक नवीन अध्याय सुरू होत आहे. विनायकने आतापर्यंत १५ एकदिवसीय सामने खेळले असून, त्यात २६ च्या सरासरीने ३१२ धावा केल्या आहेत. याव्यतिरिक्त, त्याने २३ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये २६.२९ च्या सरासरीने ४४७ धावा केल्या आहेत.

कर्णधार म्हणून निवड झाल्याबद्दल आनंद व्यक्त करताना विनायक म्हणाला, “आज मला खूप आनंद होत आहे. क्रिकेट खेळताना संघाचं प्रतिनिधित्व करण्याचं स्वप्न असतं आणि आज माझे ते स्वप्न पूर्ण झालं आहे. माझ्या कुटुंबासाठी हा एक अत्यंत महत्त्वाचा क्षण आहे. लहानपणापासूनच मला धोनीसारखा यष्टिरक्षक बनायची इच्छा होती. तो माझा आदर्श आहे.”