युवा आणि अननुभवी खेळाडूंच्या जोरावर टीम इंडियाने या वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियाच्या भूमीवरील कसोटी मालिका जिंकून इतिहास रचला. या दौर्‍यावर ज्येष्ठ खेळाडूंना दुखापत झाल्यानंतर संघाच्या युवा खेळाडूंनी अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाचा २-१ असा पराभव केला. युवा खेळाडूंच्या या कामगिरीवर खूष झाल्याने भारतीय उद्योजक आनंद महिंद्रा यांनी संघातील सहा युवा खेळाडूंना एसयूव्ही थार गाडी भेट दिली होती.

शुबमन गिल, मोहम्मद सिराज, टी. नटराजन, वॉशिंग्टन सुंदर आणि नवदीप सैनी यांना ही गाडी मिळाली होती. आयपीएलचे चौदावे सत्र पुढे ढकलल्यानंतर आता नवदीप आपला सर्व वेळ थारच्या चाचणीत घालवत आहे. खडकाळ मार्गावर, चिखल असलेल्या खराब रस्त्यावर नवदीपने थारची चाचणी घेतली. त्याने त्याचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर शेअर केला आहे.

 

नवदीपच्या या व्हिडिओवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या. काही प्रतिक्रियांना नवदीपने उत्तरही दिले.  ”इस्तेमाल करके मानोगे”, या कमेंटला उत्तर देताना नवदीप म्हणाला, ”पहले इस्तेमाल करो, फिर विश्वास करो.”

बॉर्डर-गावसकर मालिकेवर भारताचा ताबा

या वर्षाच्या सुरुवातीला पार पडलेल्या बॉर्डर-गावसकर मालिकेवर भारताने ताबा मिळवला. मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा मानहानीकारक पराभव झाला. यानंतर भारतीय संघाने अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात मेलबर्न येथे खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात ८ गडी राखून विजय मिळवला. यानंतर हनुमा विहारी आणि आर. अश्विन यांनी संयम आणि जिद्दीने फलंदाजी करत सिडनी येथील तिसरा कसोटी सामना अनिर्णित राखला. चौथ्या कसोटी सामन्यात सांघिक खेळ करत भारतीय संघाने विजय मिळवला आणि मालिका २-१ ने जिंकली.

ब्रिस्बेन येथील गाबा मैदानावर भारतीय संघाने ऐतिहासिक कामगिरी केली. ऑस्ट्रेलियाचा संघ या मैदानावर मागील ३२ वर्षांपासून अजिंक्य होता. भारताने या मैदानावर ऑस्ट्रेलियाला पराभवाची चव चाखायला लावली. याशिवाय गाबाच्या मैदानात चौथ्या डावात यशस्वी पाठलाग करण्याचा नवा विक्रम प्रस्थापित केला. याआधी २३६ ही सर्वोत्तम धावसंख्या होती. भारताने हा विक्रम मोडीत काढत ३२८ धावांच्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग केला.