Team India players react to retro 1980s look photos: भारतीय संघ दिल्लीत अफगाणिस्तानविरूद्ध तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे. ही मालिका १३ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्त्वाखालील टीम इंडिया या मालिकेत खेळण्यासाठी उतरणार आहे. जसप्रीत बुमराह फिट झाला असून तो या मालिकेत खेळताना दिसणार आहे. यादरम्यान मालिकेसाठीच्या फोटोशूटदरम्यान सध्या ट्रेंड सुरू असलेल्या १९८०च्या दशकातील खेळाडूंचे खास फोटो तयार करण्यात आले होते, यावर खेळाडूंच्या काय प्रतिक्रिया होत्या, याचा व्हिडिओ बीसीसीआयने शेअऱ केला आहे.
युरोप दौऱ्यातील भारताच्या टी-२० संघाच्या खराब कामगिरीनंतर आता संघ मायदेशात कशी कामगिरी करणार यावर सर्वांच्या नजरा असणार आहेत. जसप्रीत बुमराह संघात परतल्याने गोलंदाजी विभाग अधिक भक्कम झाला आहे. तर फलंदाजीत भारताच्या फलंदाजांकडून सातत्यपूर्ण कामगिरीची अपेक्षा असणार आहे.
अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-२० मालिकेच्या आदल्या दिवशी, भारतीय संघातील खेळाडूंचं एका फोटो-सेशन पार पाडलं. यात सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ‘८० च्या दशकातील लूक’मधील त्यांचे फोटो एका टेबलावर मांडण्यात आले होते. प्रत्येक खेळाडूने आपला लूक जाऊन पाहिला. जेव्हा १५ वर्षांचा खेळाडू वैभव सूर्यवंशी त्या टेबलाजवळ पोहोचला, तेव्हा ‘८० च्या दशकातील लूक’मधील स्वतःचा फोटो पाहून त्याला मोठा धक्काच बसला.
तो फोटो पाहिल्यावर वैभवने टिप्पणी केली की, त्यात तो ‘खूपच स्मार्ट’ दिसतो आहे. दरम्यान, अक्षर पटेलने वैभव सूर्यवंशीचा ८० च्या दशकातील शैलीतील फोटो पाहिला तेव्हा त्याला हसू आलं; त्याने म्हटलं की, फोटोमध्ये हा खेळाडू वयाने मोठा वाटत असला तरी प्रत्यक्षात मात्र तो एखाद्या लहान मुलासारखा दिसतो. त्याचप्रमाणे, हर्षित राणाऐवजी संघात समाविष्ट करण्यात आलेल्या यश ठाकूरनेही तो फोटो पाहिल्यानंतर अशी प्रतिक्रिया दिली की, त्यातील वैभव सूर्यवंशी वगळता इतर सर्व खेळाडू सहज ओळखता येत होते.
वयाच्या १५ व्या वर्षी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या वैभव सूर्यवंशीने आतापर्यंत दोन मालिका खेळल्या आहेत आणि त्या दोन्ही मालिका विदेशात खेळल्या गेल्या होत्या. आता मायदेशात पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यास सज्ज असलेल्या वैभवसाठी ही मालिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे; अभिषेक शर्माबरोबर तो सलामीला फलंदाजी करण्याची त्याची दाट शक्यता आहे.
