माजी क्रिकेटपटू दिलीप दोशी यांच्याकडून गौप्यस्फोट

लंडन येथे झालेल्या पुस्तक प्रकाशनाच्या सार्वजनिक कार्यक्रमात भारतीय क्रिकेटपटू मुखपट्टीविनाच वावरत होते, अशी माहिती भारताचे माजी क्रिकेटपटू दिलीप दोशी यांनी दिली आहे. १ सप्टेंबर रोजी झालेल्या या कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर काही दिवसांनी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासह तीन मार्गदर्शकांना करोनाची बाधा झाली होती.

‘‘मी पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात उपस्थित होतो. अनेक मान्यवरांसह भारताच्या क्रिकेटपटूंनी काही काळासाठी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. ते मुखपट्टीविनाच वावरत असल्याचे पाहून मला धक्का बसला होता. मुखपट्टीचा वापर गरजेचा आहे अथवा नाही, हे नेतेमंडळी ठरवतात. ब्रिटनमध्ये बऱ्याचशा नागरिकांचे लसीकरण झाले आहे. त्यामुळे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी निर्बंध शिथिल केले आहेत. मात्र, भारतीय खेळाडूंनी परदेशात सार्वजनिक कार्यक्रमाला हजेरी लावताना मुखपट्टीचा वापर करणे मला अपेक्षित होते,’’ असे दोषी म्हणाले.

‘आयपीएल’साठी कसोटी रद्द?

संघात करोनाचा शिरकाव झाल्याने भारतीय खेळाडूंनी इंग्लंडविरुद्धचा पाचवा कसोटी सामना खेळण्यास नकार दिला. परंतु करोनामुळे नाही, तर ‘आयपीएल’ स्पर्धेसाठी पाचवा कसोटी सामना रद्द झाला, असा दावा दोशी यांनी केला आहे. ‘‘मी वेस्ट इंडिजचे माजी क्रिकेटपटू मायकल होल्डिंग यांच्याशी चर्चा करत होतो. चौथ्या कसोटीनंतर मालिका संपावी, यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) दौऱ्यापूर्वी प्रयत्नशील होते. त्यामुळे भारतीय खेळाडूंना ‘आयपीएल’ स्पर्धेपूर्वी साधारण १५ दिवसांचा कालावधी मिळाला असता. मात्र, इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळ (ईसीबी) त्यासाठी तयार नव्हते, असे होल्डिंग यांनी मला सांगितले,’’ असे दोशी यांनी नमूद केले.

‘बीसीसीआय’कडून स्पष्टीकरण

मुखपट्टीचा वापर न केल्याने भारतीय खेळाडूंना दोष देता येणार नाही. पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाच्या स्थळी पोहोचल्यावर खेळाडूंना आश्चर्याचा धक्का बसला. इतके लोक या कार्यक्रमाला हजेरी लावतील, हे त्यांना अपेक्षित नव्हते. त्यामुळे केवळ पाच-दहा मिनिटांत खेळाडूंनी या कार्यक्रमातून बाहेर पडण्यास सुरुवात केली, असे ‘बीसीसीआय’च्या पदाधिकाऱ्यांकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे.