नटराजनला लागण; विजयसह सहा जण विलगीकरणात; हैदराबाद-दिल्ली सामन्याला परवानगी

सनरायजर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज टी. नटराजनला बुधवारी करोनाची लागण झाली आहे; परंतु तरीही दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटमधील सामन्याला हिरवा कंदील देण्यात आला आहे, असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) स्पष्ट केले आहे.

गुडघ्याच्या दुखापतीतून सावरलेला डावखुरा वेगवान गोलंदाज नटराजन आणि त्याच्या संपर्कातील अष्टपैलू खेळाडू विजय शंकरसह सहा जणांना विलगीकरणाचे निर्देश देण्यात आले आहेत. यात विजय कुमार (संघ व्यवस्थापक), श्याम सुंदर जे. (फिजिओथेरपिस्ट), अंजना व्हन्नान (डॉक्टर), तुषार खेडकर (रसद व्यवस्थापक) आणि पेरियासामी गणेशन (सरावाचा गोलंदाज) यांचा समावेश आहे.

‘‘सनरायजर्स हैदराबादच्या नटराजनला ‘आरटी-पीसीआर’ चाचणीच्या अहवालानुसार करोनाची लागण झाली आहे. त्याला कोणतीही लक्षणे आढळत नसून, अन्य खेळाडूंपासून विलग करण्यात आले आहे. ‘आयपीएल’च्या प्रमाणित कार्यपद्धतीनुसार नटराजनला १० दिवस विलगीकरणात राहावे लागेल. यानंतर दोनदा करोना चाचणीचा अहवाल नकारात्मक आल्यानंतरच त्याला जैव-सुरक्षा परिघात प्रवेश मिळेल.

‘आयपीएल’च्या पहिल्या टप्प्यात दुखापतीमुळे नटराजन खेळू शकला नव्हता. ३० वर्षीय नटराजनने २४ सामन्यांत एकूण २० बळी मिळवले आहेत. रविवारपासून ‘आयपीएल’च्या दुसऱ्या टप्प्याला प्रारंभ झाला आहे. मे महिन्यात जैव-सुरक्षित परीघात करोनाचा शिरकाव झाल्यामुळे ‘आयपीएल’ अर्ध्यावर स्थगित करण्यात आले होते. त्यावेळी अन्य काही खेळाडूंसह हैदराबादचा अनुभवी यष्टिरक्षक-फलंदाज वृद्धिमान साहालाही करोनाची लागण झाली होती.

दिल्लीकडून हैदराबादचा धुव्वा

दुबई : कागिसो रबाडाचा भेदक मारा (३/३७) आणि फलंदाजांच्या अप्रतिम कामगिरीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने बुधवारी झालेल्या ‘आयपीएल’ सामन्यात सनरायजर्स हैदराबादचा ८ गडी आणि १३ चेंडू राखून पराभव केला. गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेल्या दिल्लीचा हा नऊ सामन्यांत सातवा विजय ठरला.

दुबईतील या सामन्यात हैदराबादने दिलेले १३५ धावांचे लक्ष्य दिल्लीने १७.५ षटकांत गाठले. सलामीवीर पृथ्वी शॉ (११) फार काळ खेळपट्टीवर टिकू शकला नाही. मात्र, अनुभवी शिखर धवनने (४२) दुसऱ्या गड्यासाठी श्रेयस अय्यरसोबत ५२ धावांची भागीदारी रचली. रशीद खानने धवनला बाद करत ही जोडी फोडली. मात्र, श्रेयस (नाबाद ४७) आणि कर्णधार ऋषभ पंत (नाबाद ३५) यांनी अभेद्य अर्धशतकी भागीदारी रचत दिल्लीला विजय मिळवून दिला.

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करणाऱ्या हैदराबादला २० षटकांत ९ बाद १३४ धावाच करता आल्या. डेव्हिड वॉर्नर (०) आणि केन विल्यमसन (१८) झटपट माघारी परतले. अब्दुल समाद (२८) आणि रशीद (२२) यांच्या व्यतिरिक्त हैदराबादचे फलंदाज अपयशी ठरले.

’  संक्षिप्त धावफलक

सनरायजर्स हैदराबाद : २० षटकांत ९ बाद १३४ (अब्दुल समाद २८, रशीद खान २२;  कागिसो रबाडा ३/३७) पराभूत वि. दिल्ली कॅपिटल्स : १७.५ षटकांत २ बाद १३९ (श्रेयस अय्यर नाबाद ४७, शिखर धवन ४२, ऋषभ पंत नाबाद ३५; रशीद खान १/२६)