‘आयपीएल’च्या महाअंतिम सामन्यात चेन्नईपुढे गिलला रोखण्याचे आव्हान

पीटीआय, अहमदाबाद : IPL 2023 Final एकीकडे चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा कारकीर्दीचा विजयी सांगतेचा प्रयत्न, तर दुसरीकडे गुजरात टायटन्सचे जेतेपद आपल्याकडेच राखण्याचे ध्येय. इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटच्या १६व्या हंगामाचा महाअंतिम सामना रविवारी खेळवला जाणार असून धोनी आणि गुजरात यांच्यापैकी कोणाचे स्वप्न पूर्ण होणार याकडे साऱ्यांचे लक्ष असेल.

BJP workers waited four hours for Priyanka Gandhis road show
नवलचं! प्रियंका गांधींच्या ‘रोड-शो’साठी भाजपचे कार्यकर्ते चार तास प्रतीक्षेत का होते?
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
Jasprit Bumrah and Tabraiz Shamsi have similar T20I stats
Jasprit Bumrah : तबरेझ शम्सीच्या पोस्टने क्रिकेट विश्वाला दिला आश्चर्याचा धक्का! जसप्रीत बुमराहबरोबर घडला असा योगायोग की विश्वासच बसणार नाही
Aditi Tatkare
मविआतील बंडखोरी आदिती तटकरेंच्या पथ्यावर ?
Maharashtra Elections Assembly Elections 2024 Election Commission
महाराष्ट्र वाहून जाणार की आपली वेगळी वाट आखणार?
marathi actor atul kulkarni
वेडी आशा
campaign will stop today
प्रचारतोफा आज थंडावणार, निवडणूक आयोगाची ‘छुप्या प्रचारा’वर नजर

अहमदाबादच्या १ लाख ३२ हजार आसनसंख्या असलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणारा अंतिम सामना चेन्नईचा कर्णधार धोनीच्या कारकीर्दीतील अखेरचा सामना ठरू शकेल. ४१ वर्षीय धोनीचा हा अखेरचा हंगाम असल्याचे म्हटले जात होते. धोनीने अद्याप कोणताही निर्णय जाहीर केलेला नसला, तरी आपल्या कर्णधाराला विजयी निरोप देण्यासाठी चेन्नईचे खेळाडू उत्सुक असतील. मात्र, चेन्नईच्या मार्गात गतविजेत्या गुजरात संघाचा आणि त्यांचा सलामीवीर शुभमन गिलचा अडथळा आहे.

अलौकिक प्रतिभा असलेल्या गिलच्या कौशल्यपूर्ण फलंदाजीच्या बळावर गुजरातने मुंबई इंडियन्सचा पराभव करत सलग दुसऱ्यांदा ‘आयपीएल’च्या अंतिम फेरीत स्थान मिळवले. गिलला रोखण्यात मुंबईचे गोलंदाज सपशेल अपयशी ठरले. त्याने ६० चेंडूंतच १२९ धावांची खेळी केली. हे त्याचे गेल्या चार सामन्यांतील तिसरे शतक ठरले. त्याने यंदाच्या हंगामात तब्बल ८५१ धावा केल्या असून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला मिळणारी ‘ऑरेंज कॅप’ त्याच्याकडेच राहणार हे निश्चित आहे. आता चेन्नईला पाच ‘आयपीएल’ जेतेपदांच्या मुंबईच्या विक्रमाशी बरोबरी साधायची झाल्यास गिलला रोखण्याचे त्यांच्यापुढे आव्हान असेल.

चेन्नई सुपर किंग्ज : कॉन्वे, ऋतुराजवर भिस्त

’चेन्नईच्या फलंदाजीची भिस्त डेव्हॉन कॉन्वे आणि ऋतुराज गायकवाड या सलामीवीरांवर असेल. यंदाच्या हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये कॉन्वे (६२५ धावा) आणि ऋतुराज (५६४ धावा) हे अनुक्रमे चौथ्या आणि सातव्या स्थानावर आहेत. या दोघांनी ‘क्वालिफायर-१’च्या सामन्यातही गुजरातविरुद्ध चेन्नईला चांगली सुरुवात मिळवून दिली होती. त्यामुळे चेन्नईला विजय मिळवणे सोपे गेले. मधल्या फळीत अजिंक्य रहाणे आणि शिवम दुबे यांनी काही महत्त्वपूर्ण खेळी केल्या असून अखेरच्या षटकांत फटकेबाजीची जबाबदारी रवींद्र जडेजा व कर्णधार धोनी यांच्यावर असेल.

जडेजा, चहरवर नजर

चेन्नईपुढे गिलला रोखण्याचे आव्हान असून सुरुवातीच्या षटकांत दीपक चहरला प्रभावी मारा करावा लागेल. ‘क्वालिफायर-१’च्या सामन्यात चहरनेच गिलला माघारी पाठवले होते. त्यानंतर गुजरातची मधली फळी अडचणीत सापडली आणि चेन्नईने विजय मिळवला. मधल्या षटकांत डावखुरा फिरकीपटू रवींद्र जडेजा प्रभावी मारा करत आहे. जडेजाने यंदा १५ सामन्यांत १९ बळी मिळवले असून त्याने षटकामागे केवळ ७.४१च्या धावगतीने धावा दिल्या आहेत. तसेच अखेरच्या षटकांत मथीश पाथिरानाविरुद्ध धावा करणे फलंदाजांना अवघड जात आहे. तुषार देशपांडे धावा देत असला, तरी त्याच्यात गडी बाद करण्याची क्षमता आहे.

यंदाच्या ‘आयपीएल’मध्ये गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज हे संघ तिसऱ्यांदा आमनेसामने येणार आहेत. यापूर्वी सलामीला झालेल्या लढतीत गुजरातने पाच गडी राखून विजय मिळवला होता, तर गेल्या मंगळवारी झालेल्या ‘क्वालिफायर-१’च्या सामन्यात चेन्नईने १५ धावांनी सरशी साधली होती.

चेन्नई सुपर किंग्जने आज होणारा अंतिम सामना जिंकल्यास ते सर्वाधिक पाच ‘आयपीएल’ जेतेपदांच्या मुंबई इंडियन्सच्या विक्रमाशी बरोबरी साधतील. चेन्नईने २०१०, २०११, २०१८ व २०२१ मध्ये जेतेपद मिळवले होते.

हार्दिकच्या नेतृत्वात धोनीची झलक -गावस्कर

नवी दिल्ली : हार्दिक पंडय़ाचा मैदानावरील शांत व संयमी वावर आणि संघातील अन्य खेळाडूंनाही तितकेच शांत ठेवण्याचा गुण पाहिल्यावर महेंद्रसिंह धोनीची आठवण होते, अशा शब्दांत भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी हार्दिकच्या नेतृत्वकौशल्याचे कौतुक केले. ‘‘हार्दिकवर धोनीच्या व्यक्तिमत्त्वाचा मोठा प्रभाव पडलेला दिसून येतो. हार्दिकला आपण कर्णधार म्हणून किती झटपट शिकत गेलो हे दाखविण्याची चांगली संधी अंतिम सामन्याच्या निमित्ताने मिळाली आहे. गेल्या वर्षी प्रथमच नेतृत्व करताना हार्दिक थोडा उथळ वाटला. पण अनुभवाने त्याला इतके झटपट बदलायला लावले की आता त्याच्या नेतृत्वात धोनीची झलक जाणवते,’’ असेही गावस्कर यांनी सांगितले. ‘‘कर्णधार म्हणून मैदानावर शांत राहणे आणि निर्णायक क्षणी खेळाडूंना शांत ठेवणे ही एक कला आहे. ही कला हार्दिकने अवगत केली आहे. क्रिकेटचे चांगले ज्ञान त्याच्याकडे आहे,’’ असेही गावस्कर म्हणाले.

गुजरात टायटन्स  : गिल विक्रम मोडणार?

’अविश्वसनीय कामगिरी करत असलेल्या शुभमन गिलला एका ‘आयपीएल’ हंगामात सर्वाधिक धावांचा विक्रम खुणावतो आहे. गिलने आतापर्यंत ८५१ धावा केल्या असून एका हंगामात सर्वाधिक धावांचा विक्रम विराट कोहलीच्या (२०१६च्या हंगामात ९७३ धावा) नावे आहे. त्यामुळे अंतिम सामन्यात १२३ धावांची खेळी केल्यास गिल हा विक्रम आपल्या नावे करू शकेल. सध्या तो ज्या लयीत आहे ते पाहता, तो हा विक्रम मोडण्याची शक्यता नाकारता येत नाही. गुजरातच्या फलंदाजीची भिस्त त्याच्यासह कर्णधार हार्दिक पंडय़ा, डेव्हिड मिलर आणि वृद्धिमान साहा यांच्यावर असेल. 

शमी, रशीदकडून अपेक्षा

गुजरातच्या यशात गोलंदाजांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. यंदाच्या हंगामात सर्वाधिक बळी मिळवणारे तीन गोलंदाज गुजरातच्या संघातीलच आहेत. मोहम्मद शमी (१६ सामन्यांत २८ बळी), रशीद खान (१६ सामन्यांत २७ बळी) व मोहित शर्मा (१३ सामन्यांत २४ बळी) हे गुजरातचे गोलंदाज उत्कृष्ट कामगिरी करत आहेत. सुरुवातीच्या षटकांत शमी भेदक मारा करत असून मधल्या षटकांत रशीदने प्रतिस्पर्धी संघांतील फलंदाजांना अडचणीत टाकले आहे. अखेरच्या षटकांत फलंदाजांना रोखण्याची जबाबदारी मोहित चोख बजावत आहे. अंतिम सामन्यातही त्यांच्याकडून दमदार कामगिरीची अपेक्षा असेल.