इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटच्या १४व्या हंगामातील पूर्वार्धात सातत्यपूर्ण कामगिरी करणारा दिल्ली कॅपिटल्स बुधवारपासून आपल्या अभियानाला पुन्हा आरंभ करणार आहे. गुणतालिकेत तळाशी असलेला सनरायजर्स हैदराबाद त्यांचा विजयरथ रोखण्यात यशस्वी होणार का, हे पाहणे रंजक ठरेल.

ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या दिल्लीने आठपैकी सहा सामने जिंकून १२ गुण कमावले आहेत. दुसरीकडे हैदराबादला मात्र सातपैकी एकच सामना जिंकता आला आहे. त्यामुळे बादफेरीतील स्थान पक्के करण्यासाठी पुढील प्रत्येक लढत त्यांच्यासाठी ‘जिंकू किंवा मरू’ या स्वरूपाची असेल. उभय संघांत एप्रिलमध्ये झालेल्या पहिल्या टप्प्यातील सामन्यात दिल्लीने सुपर ओव्हरमध्ये सरशी साधली होती. त्यामुळे आता हैदराबादला पराभवाची परतफेड करण्याची संधी आहे. श्रेयस अय्यर दुखापतीतून सावरत संघात परतल्यामुळे दिल्लीची फलंदाजी अधिक बळकट झाली आहे.

’ वेळ : सायंकाळी ७.३० वा.

’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोटर्स १