scorecardresearch

इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट : लखनऊची विजयी घोडदौड

कर्णधार केएल राहुल (५१ चेंडूंत ७७ धावा) आणि दीपक हुडा (३४ चेंडूंत ५२) यांच्या अर्धशतकांनंतर मोहसिन खानने (४/१६) केलेल्या प्रभावी माऱ्यामुळे लखनऊ सुपर जायंट्सनी रविवारी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सवर सहा धावांनी मात केली.

दिल्लीवर सहा गडी राखून मात; राहुल-दीपकचे अर्धशतक, मोहसिनचे चार बळी

पीटीआय, मुंबई
कर्णधार केएल राहुल (५१ चेंडूंत ७७ धावा) आणि दीपक हुडा (३४ चेंडूंत ५२) यांच्या अर्धशतकांनंतर मोहसिन खानने (४/१६) केलेल्या प्रभावी माऱ्यामुळे लखनऊ सुपर जायंट्सनी रविवारी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सवर सहा धावांनी मात केली. लखनऊचा हा १० सामन्यांत सातवा आणि सलग तिसरा विजय ठरला.
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात लखनऊने दिलेल्या १९६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीला २० षटकांत ७ बाद १८९ धावांचीच मजल मारता आली. त्यामुळे ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील दिल्लीच्या संघाला आठ सामन्यांतील चौथा पराभव पत्करावा लागला.
दुपारच्या वेळेत झालेल्या या सामन्यात लखनऊचा कर्णधार राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. राहुल आणि डावखुरा क्विंटन डीकॉक (१३ चेंडूंत २३) सलामीवीरांनी लखनऊच्या डावाची चांगली सुरुवात केली. या दोघांनी चार षटकांत ४२ धावांची सलामी दिल्यावर डीकॉकला शार्दूल ठाकूरने बाद केले. यानंतर राहुलने दीपक हुडाच्या साथीने ९५ धावांची भर घालत लखनऊच्या डावाला आकार दिला. राहुलने चार चौकार आणि पाच षटकारांच्या साहाय्याने ७७ धावा, तर दीपकने ३४ चेंडूंत सहा चौकार आणि एका षटकाराच्या साहाय्याने ५२ धावांची खेळी साकारली. दीपकचे हे यंदाच्या हंगामातील पहिलेच अर्धशतक ठरले. अखेर या दोघांना शार्दूलने माघारी पाठवले. मग मार्कस स्टोइनिस (नाबाद १७) आणि कृणाल पंडय़ा (९ धावा) यांनी काही चांगले फटके मारल्याने लखनऊने २० षटकांत ३ बाद १९५ अशी धावसंख्या उभारली.
याचा पाठलाग करताना दिल्लीचे सलामीवीर पृथ्वी शॉ (५) आणि डेव्हिड वॉर्नर (३) यांना अनुक्रमे दुष्मंता चमीरा आणि मोहसिन यांनी झटपट माघारी धाडले. त्यामुळे दिल्लीची २ बाद १३ अशी स्थिती झाली. मग कर्णधार पंत (३० चेंडूंत ४४) आणि मिचेल मार्श (२० चेंडूंत ३७) यांनी ६० धावांची भागीदारी रचत दिल्लीचा डाव सावरला. मात्र, कृष्णप्पा गौतमने मार्शला, तर मोहसिनने पंतला बाद करत दिल्लीला पुन्हा अडचणीत टाकले. अखेरच्या षटकांत अक्षर पटेल (२४ चेंडूंत नाबाद ४२) आणि रोव्हमन पॉवेल (२१ चेंडूंत ३५) यांनी फटकेबाजी केली. मात्र, त्यांना दिल्लीला विजय मिळवून देता आला नाही.
संक्षिप्त धावफलक
लखनऊ सुपर जायंट्स : २० षटकांत ३ बाद १९५ (केएल राहुल ७७, दीपक हुडा ५२; शार्दूल ठाकूर ३/४०) विजयी वि. दिल्ली कॅपिटल्स : २० षटकांत ७ बाद १८९ (ऋषभ पंत ४४, अक्षर पटेल नाबाद ४२, मिचेल मार्श ३७; मोहसिन खान ४/१६, कृष्णप्पा गौतम १/२३)-सामनावीर : मोहसिन खान

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Indian premier league cricket lucknow winning streak beating delhi six wickets rahul deepak half century mohsin wicket amy

ताज्या बातम्या