राजधानीतला टेनिस तमाशा

उद्घाटनापासूनच दिल्लीतल्या रॉजर फेडरर विरुद्ध राफेल नदाल लढतीसाठी वातावरणनिर्मित्ती करण्यात आली होती

इंटरनॅशनल प्रीमिअर टेनिस लीग असं लांबलचक नावाच्या महेश भूपतीप्रणीत स्पर्धेचा दुसरा हंगाम राजधानी दिल्लीत नुकताच रंगला. १६,००० प्रेक्षक क्षमता असणाऱ्या इंदिरा गांधी इन्डोअर स्टेडियममध्ये गुरुवारी जेमतेम ५,००० चाहते होते. शुक्रवारी तर कोणताही नावाजलेला खेळाडू खेळणार नसल्याने उपस्थिती आणखी रोडावलेली. या सगळ्याची कसर भरून काढेल असा महामुकाबला शनिवारी आयोजित केलेला. दुसऱ्या हंगामाच्या उद्घाटनापासूनच दिल्लीतल्या रॉजर फेडरर विरुद्ध राफेल नदाल लढतीसाठी वातावरणनिर्मित्ती करण्यात आली होती; परंतु दोन दिवसांतला चाहत्यांचा प्रतिसाद लक्षात घेऊन संयोजकांच्या मनात धास्ती होती. म्हणूनच शुक्रवारी रात्री महेश भूपतीला ट्विट करावं लागलं- फेडरर आणि नदालवरचं तुमचं प्रेम सिद्ध करा..  हे ट्विट दुसऱ्या हंगामाची अवस्था दर्शवण्यासाठी पुरेसं बोलकं आहे. फेडरर आणि नदाल यांचा प्रचंड चाहतावर्ग भारतात आहे. हे दोघे कोणत्याही स्पर्धेत समोरासमोर असले की, स्टेडियम हाऊसफुल्ल होतं. पण दिल्ली अपवाद ठरलं.

याच लढतीतला एक प्रसंग- नदालचा नेटवर आदळलेला फटका पंच अवैध ठरवतात. हे सांगण्यास त्यांना किंचित उशीर होतो. हक्काचा गुण गमावल्यामुळे नदालचा सहकारी रोहन बोपण्णा निषेध व्यक्त करत पंचांसमोर उभा राहतो. पंचही आपल्या निर्णयावर ठाम राहतात. पंच बसलेल्या उंचपुऱ्या खुर्चीवर बोपण्णा धाव घेतो. त्यांना गदगदा हलवतो. पलीकडच्या यूएई रॉयल्स संघातील एरवी शांत आणि मितभाषी क्रिस्तिना लाडेनोव्हिक या वादग्रस्त निर्णयाला प्रतिसाद म्हणून केळ्याचं साल पंचांच्या दिशेने भिरकवते. हे सगळं गमतीत सुरू असतं. खुद्द पंच, खेळाडू आणि प्रेक्षकवर्ग हसून या प्रकाराला दाद देतात. मात्र पंच आणि त्यांच्या निर्णयाचा आदर करण्याची शिकवण बाणलेला फेडरर तटस्थपणे सगळा तमाशा पाहत असतो. पैशासाठी काय पाहावं लागेल, असा आशयाचा कटाक्ष फेडरर टाकतो. पलीकडच्या बाजूला नदालही हे नाटय़ संपून खेळ कधी सुरू होईल याची वाट पाहत असतो. थोडय़ा वेळाने हा थिल्लरपणा थांबतो आणि हे दोघेही सुस्कारा टाकतात.

इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) या फ्रँचायजी आधारित लीग क्रिकेट स्पर्धेच्या यशानंतर सर्वच खेळांमध्ये लीगचं पेव फुटलं. २००९ ते २०१५ या कालावधीत उदयास आलेल्या क्रिकेटेतर खेळांच्या लीगना विविध प्रश्नांनी वेढलं आहे. अर्थकारण हा वादग्रस्त मुद्दा. लीगच्या माध्यमातून पैसा कमावणं काहीच गैर नाही. पोटासाठी प्रत्येकाला पैसा लागतोच; परंतु या पैशाचा ताळेबंद पारदर्शक असायला हवा. आयपीटीएलच्या बाबतीत, युवा खेळाडूंना, चाहत्यांना दिग्गज खेळाडूंना प्रत्यक्ष पाहता यावं यासाठी हा खटाटोप आहे, असा संयोजकांचा दावा आहे; परंतु चांगल्या दर्जाचं टेनिस पाहण्याची इच्छा असलेल्या प्रेक्षकांना लीगचं तिकीट म्हणजे भरुदड आहे. ज्याला पाहण्यासाठी चाहते स्टेडियममध्ये येतात, तो संघात असतो पण तो खेळेलच याची शाश्वती नसते. तो न खेळण्याचं कोणतंही कारण चाहत्यांना दिलं जात नाही. आणि त्यापलीकडे कितीही मोठा खेळाडू असला तरी तो एकच सेट खेळणार असतो. त्यामुळे जेमतेम २०-२२ मिनिटांसाठी हजारो रुपये खर्चावेत का, हा प्रश्न उरतोच. पारंपरिक टेनिसची आवड असणाऱ्यांना लीगचं स्वरूप भावलेलं नाही हे स्पष्ट होत आहे. प्रक्षेपणरंजकता वाढवण्यासाठी नेहमीच्या नियमांना मसाला देण्यात आला आहे. यामुळे प्रत्यक्ष लीगला खेळापेक्षा जत्रेचं स्वरूप प्राप्त झालं आहे. टेनिसचा हंगाम नोव्हेंबर महिन्यात आटोपतो तर नवा हंगाम जानेवारीत सुरू होतो. या मधल्या काळात सराव व्हावा आणि त्यासाठी बक्कळ पैसे मिळत असतील तर आंतरराष्ट्रीय खेळाडूंना काय हवं..

हे प्रदर्शनीय सामने नाहीत, आम्ही गांभीर्याने खेळतो, असा दावा खेळाडू करत असले तरी स्पर्धेचं स्वरूप त्याला छेद देतं. या लीगची प्रेरणा असलेल्या आयपीएलमध्येही चीअरलीडर्स, पाटर्य़ा होतच असत, पण मैदानावर क्रिकेट नेहमीच्या नियमांनुसार होत असे. इथे त्याचाच अभाव जाणवतो.

आयपीटीएलचा पसारा ४० मिलियन डॉलर्सचा आहे. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेला नोव्हाक जोकोव्हिच, सर्वकालीन महान खेळाडू फेडरर, नदाल यांच्यासाठी संघांनी किती पैसे खर्च केले, फ्रँचायजींनी संघ विकत घेण्यासाठी किती गंगाजळी ओतली, प्रक्षेपण हक्क किती रकमेला विकण्यात आले या सगळ्याविषयी कमालीची गुप्तता पाळण्यात येते. अन्य लीगचे लिलाव आणि मालामाल होणारे खेळाडू टीव्हीवर चमकत असताना, या लीगचा ड्राफ्ट मात्र पडद्याआड बंद खोलीत होतो. पहिल्या हंगामानंतर लीगचे मुख्य प्रायोजक असणाऱ्या कंपनीला २४ कोटी एवढा तोटा झाल्याचे स्पष्ट झाले. कोणत्याही स्पर्धेला मिळणारा जनाधार हे त्यांचं शक्तिस्थान असतं. मात्र नफ्यासाठी कॉर्पोरेट बॉक्स वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. पंचतारांकित आदरातिथ्य देणाऱ्या बॉक्सची संख्या यंदा १०८ एवढी होती. विकसनशील, गरीब अशा विशेषणांनी संलग्न आपल्या देशात ५०,००० आणि त्यापेक्षा जास्त किमतीचे बॉक्स विकत घेणारा वर्ग आहे. टेनिस ही जिमखाने, क्लब्स यांची मक्तेदारी आहे. सर्वसामान्य खेळाडूंना खेळण्यासाठी कोर्ट्स नाहीत अशी ओरड होते. आयपीटीएलच्या निमित्ताने टेनिस पाहणं हेही सधन वर्गापुरतंच मर्यादित राहणार हे सिद्ध झालं आहे.

स्पर्धेतील दिग्गज खेळाडू आणि राजधानी दिल्ली हे समीकरण असल्याने सुरक्षाव्यवस्था कडेकोट असणं अत्यावश्यक आहे. पण यंदा सुरक्षेचा अतिरेक झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. एका प्रेक्षकामागे दोन पोलीस अशी परिस्थिती होती. इंदिरा गांधी स्टेडियमला पोलीस छावणीचं रूप आलं होतं. गुरुवार, शुक्रवारी चाहते आणि पोलीस यांची उपस्थिती समसमान जाणवत होती. तपासाची कर्मठ यंत्रणा, अरेरावी भाषा या दिल्ली पोलिसांच्या भूमिकेनेही चाहत्यांना त्रास झाला.

अर्थकारणाची घडी, नफा, खेळ संस्कृतीचा विकास, जनाधार अशी विविधं आव्हानं आयपीटीएलसमोर आहेत. आतापर्यंत दिवाणखान्यात बसून ग्रँड स्लॅम पाहणं एवढय़ापुरतं आपण संकुचित होतो. आता टीव्हीच्या पडद्यावर आयपीटीएलरूपी टेनिसजत्रा अनुभवणं एवढाच परीघ विस्तारणं लीगसाठी नामुष्की आहे.

पराग फाटक

parag.phatak@expressindia.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Indian premier tennis league in rajdhani delhi

ताज्या बातम्या