जगदीशची निराशाजनक कामगिरी

भारताचा स्कीइंगपटू जगदीश सिंगला पुरुषांच्या १५ किलोमीटर क्रॉसकंट्री प्रकारात निराशाजनक कामगिरीस सामोरे जावे लागले. त्याच्या पराभवासह भारताचे हिवाळी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.

जगदीशने प्रथमच या स्पर्धेत भाग घेतला होता. त्याला १०३ वे स्थान मिळाले. २६ वर्षीय जगदीशने ही शर्यत ४३ मिनिटे ३ सेकंदांत पार केली. स्वित्र्झलडच्या दारिओ कोलोग्नाने हे अंतर ३३ मिनिटे ४३.९ सेकंदांत पार केले. सिमेन क्रुगेर (३४ मिनिटे २.२ सेकंद) व डेनिस स्पित्सोव (३४ मिनिटे ६.०९ सेकंद) यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्यपदकाची कमाई केली.

जगदीश पहिल्या दीड किलोमीटर अंतराच्या टप्प्यात कोलोग्नापेक्षा ४० सेकंद पिछाडीवर होता. साडेसात किलोमीटर अंतर पार केल्यानंतर तो कोलोग्नापेक्षा ४ मिनिटे २८ सेकंद पिछाडीवर होता. जगदीशची नंतर दमछाक झाली व त्याला पहिल्या शंभर खेळाडूंमध्येही स्थान मिळवता आले नाही. या स्पर्धेतील ट्रॅकमध्ये चढउतारांचा समावेश असतो. भारताच्या शिवा केशवनचे आव्हान यापूर्वीच संपले होते.

आयओसीकडून पेंगिली यांची क्षमायाचना

’ सुरक्षा अधिकाऱ्यांशी वादविवाद झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे (आयओसी) इंग्लंडचे सदस्य अ‍ॅडम पेंगिली यांना मायदेशी पाठविण्यात आले. त्याबद्दल आयओसीने त्यांची माफी मागितली आहे.

’ माजी स्केलेटॉन शर्यतपटू पेंगिली यांचे येथील एका सुरक्षारक्षकाबरोबर भांडण झाले. या सुरक्षारक्षकाने फक्त अतिमहत्त्वाच्या कक्षात जाताना त्यांच्याकडे योग्य पत्र नसल्यामुळे त्यांना अडविले. त्यामुळे त्यांनी सुरक्षारक्षकास अपशब्द उच्चारले. या रक्षकाने रीतसर तक्रार नोंदवल्यानंतर आयओसीच्या नीतिमत्ता मूल्ये विभागाच्या अधिकाऱ्याने त्याबाबत चौकशी करुन पेंगिली यांना तत्काळ कोरियातून मायदेशी जाण्यास सांगितले. आयओसीने याबाबत झालेला प्रकार अतिशय अयोग्य आहे, मात्र असे अचानक पेंगिली यांना स्पर्धेच्या ठिकाणाहून बाहेर जावे लागल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे.