आपल्या क्रिकेटवेड्या देशामध्ये आता हळूहळू फुटबॉललादेखील ओळख मिळण्यास सुरुवात झाली आहे. फुटबॉलची लोकप्रियता वाढवण्यासाठी अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (एआयएफएफ) आयपीएलच्या धर्तीवर ‘इंडियन सुपर लीग’ (आयएसएल) स्पर्धेची सुरुवात केली आहे. या स्पर्धेमुळे विविध देशांतील प्रतिभावान फुटबॉलपटू भारतामध्ये येऊन फुटबॉल खेळताना दिसतात. नुकतेच विराट कोहलीची सहमालकी असलेला संघ, एफसी गोवाने स्पेनचा प्रतिभावंत फुटबॉलपटू अल्वारो वॅझकेझ याला दोन वर्षांसाठी करारबद्ध केले आहे. त्यामुळे २०२४ च्या हंगामापर्यंत अल्वारो गोव्याच्या ऑरेंज जर्सीमध्ये खेळताना दिसेल.

स्ट्रायकर असलेला अल्वारो यापूर्वी केरळ ब्लास्टर्स या संघाकडून खेळत होता. आयएसएलच्या २०२१-२२ या हंगामामध्ये आठ गोल करून त्याने केरळच्या संघाला स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहोचण्यात मोलाचा वाटा उचलला होता. याशिवाय, त्याने दोन गोल करण्यातही (असिस्ट) मदतही केली होती. हा त्याचा पहिलाच आयएसएल हंगाम होता. एफसी गोवाशी करारबद्ध होताना खूप आनंद होत असल्याचे वॅझकेझ याने एफसीगोवा डॉट इनशी बोलताना सांगितले.

“एफसी गोवाशी करारबद्ध होताना मला आनंद होत आहे. या क्लबची स्वत:ची एक अनोखी पद्धत आहे. जिने मला कायम प्रभावीत केले आहे. शिवाय क्लबकडे महत्त्वपूर्ण प्रोजेक्ट आहेत. व्यवस्थापनाकडे दूरदृष्टी आहे. एफसी गोवाचे पदाधिकारी आणि मुख्य प्रशिक्षक इडू बेडिया यांच्याशी चर्चा केल्यानंतर, या क्लबमध्ये खेळताना मी स्वतःला आणखी सिद्ध करू शकतो, असा विश्वास वाटल्यामुळे मी कराराला होकार दिला.” असे वॅझकेझ म्हणाला.

हेही वाचा – FIFA World Cup Qatar 2022 : फुटबॉलच्या कुंभमेळ्यादरम्यान दारू आणि सेक्सला बंदी! चाहत्यांसाठी कतारने जाहीर केली नियमांची यादी

बार्सिलोनामध्ये जन्मलेल्या अल्वारो वॅझकेझच्या कारकिर्दीतील सर्वाधिक काळ स्पेनच्या फुटबॉल वर्तुळात गेला आहे. ३१वर्षीय अल्वारोने ला-लिगा स्पर्धेत आरसीडी इस्पॅनॉल युवा संघाचे प्रतिनिधित्व केले होते. पुढे स्पेनमधील टॉप क्‍लबकडून खेळताना रिअल माद्रिद आणि बार्सिलोनाविरुद‍्ध गोल केले होते. तो काही काळ गेटॅफेसाठीदेखील खेळला आहे. चार हंगामात त्याने या क्लबचे प्रतिनिधित्व केले. याशिवाय तो इंग्लिश प्रीमियर लीगमध्येही खेळला. तिथे त्याने स्वॉन्सिया सिटीचे प्रतिनिधित्व केले होते.

स्पेनमध्ये कनिष्ठ स्तरावर खेळताना २०११मध्ये झालेल्या २० वर्षांखालील फिफा विश्वचषकामध्ये त्याने सर्वाधिक गोल केले होते. २०१३मध्ये २१ वर्षांखालील यूएफा युरो स्पर्धेच्या विजेत्या स्पेन संघातही त्याचा समावेश होता. आपल्या १७ वर्षांच्या क्‍लब आणि स्पेनच्या राष्ट्रीय फुटबॉल कारकिर्दीत त्याने ३४४ सामने खेळत ८० गोल केले आहेत. तसेच १९ गोल करण्यास मदत (असिस्ट) केली आहे.

हेही वाचा – Ranji Trophy Final 2022 : “ते नसते तर मी कधीच…”, सर्फराज खानने ‘या’ व्यक्तीला दिले यशाचे श्रेय

अल्वारो वॅझकेझने बोलताना एफसी गोवा क्लबचे महत्त्व अधोरेखित केले आहे. “एफसी गोवा हा इंडियन सुपर लीगमधील एक सर्वात मोठा आणि लोकप्रिय क्लब आहे, असे मी मानतो. मागील आयएसएल हंगामात क्लबची कामगिरी लौकिकाला साजेशी झाली नाही. मात्र, पुढील हंगामात तो पुन्हा चांगली कामगिरी करेल, असा मला विश्वास वाटतो. एफसी गोवाचे खूप चाहते आहेत. त्यामुळे हजारो चाहत्यांच्या उपस्थितीत मला खेळण्याचा अनुभव घ्यायचा असतो. गोवाकडून पहिली लढत खेळण्यासाठी मी चातकाप्रमाणे वाट बघत आहे, असे अल्वारो वॅझकेझने म्हणाला.”

एफसी गोवाचे फुटबॉल संचालक रवी पुस्कूर यांनी अल्वारो वॅझकेझच्या समावेशाबद्दल आनंद व्यक्‍त केला आहे. “अल्वारो एक प्रतिभावान खेळाडू आहे. त्याचा खेळ हीच त्याची ओळख आहे. अल्वारोने भारतातील फुटबॉल आणि येथील संस्कृती आपलीशी केली आहे. एफसी गोवाकडून तो पूर्ण क्षमतेने खेळेल,” असा विश्‍वास त्यांनी व्यक्‍त केला.