भारतात बीफ खाण्यावर बंदी आल्यापासून एकचं रणकंदन माजलं. सर्व राजकीय पक्षांनी सरकारच्या या निर्णयावर चांगलीच टीका केली. विरोधी पक्षांप्रमाणे अनेक भारतीयांनी सोशल मीडियावरही या निर्णयाविरोधात आपला रोष व्यक्त केला. मात्र एका भारतीय चाहत्याने बीफबंदी विरोधात आपली नाराजी व्यक्त करण्यासाठी चक्क क्रिकेटच्या मैदानाची निवड केली आहे.

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज दुसऱ्या वन-डे सामन्यात, होय आम्ही तामिळी बीफ खातो! असं पोस्टर झळकावणारा भारतीय व्यक्ती सध्या सोशल मीडियावर चांगलाच ट्रेंड होतोय. काहींनी टीव्ही स्क्रिनवरुन या चाहत्याचा फोटो काढत सोशल मीडियावर टाकलाय. ज्यावर बीफबंदीचे समर्थक आणि विरोधक अक्षरशः तुटून पडले आहेत. काहींनी या व्यक्तीवर टीकेची झोड उठवली असून काही लोकांनी या प्रकाराकडे केवळ एक विनोद म्हणून सोडून दिल्याचं सोशल मीडियावर दिसून येतंय. गेल्या महिन्याच्या अखेरीस केंद्रातील भाजप सरकारने गाई-म्हशींना कत्तलखान्यात विकण्यापासून बंदी केली आहे.

चॅम्पियन्स करंडकात अंतिम सामन्यात पाकिस्तानकडून मार खाल्ल्यानंतर भारताचा वेस्ट इंडिज दौरा सुरु झाला आहे. पहिल्या सामन्यावर पावसाने पाणी फिरवल्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजवर १०५ धावांनी मात केली आहे. सध्या भारत या मालिकेत १-० अशा आघाडीवर आहे. अजिंक्य रहाणेचं शतक आणि कर्णधार विराट कोहलीने अखेरच्या षटकांमध्ये केलेली तुफान फटकेबाजी यामुळे वेस्ट इंडिजसमोर ३११ धावांचं लक्ष्य होतं. मात्र या धावसंख्येचा पाठलाग करताना विंडिजचा संघ केवळ २०५ धावा करु शकला होता.

वेस्ट इंडिजमध्ये अनेक अनिवासी भारतीय वास्तव्याला आहेत. यापैकीच एका तामिळी व्यक्तीने भारतातल्या बीफबंदी या ज्वलंत विषयावर पोस्टर झळकावत आपला निषेध व्यक्त केला आहे.