IND vs ENG Team India 3 World Record: इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यात भारताने वादळी फलंदाजी करत धावांचा डोंगर उभारला. नाणेफेक जिंकल्यानंतर इंग्लंडने भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं आणि भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने सांगितल्याप्रमाणे, टीम इंडियालादेखील प्रथम फलंदाजी करायची होती. भारताच्या फलंदाजांनी कर्णधाराचा हा निर्णय योग्य ठरवला. यासह टीम इंडियाने ७ विकेट्स गमावत सेमीफायनलमध्ये २५३ धावा केल्या आणि ३ वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावे केला.

भारताकडून संजू सॅमसनने वेस्ट इंडिजविरूद्धच्या सामन्यातील फॉर्म कायम ठेवला आणि या सामन्यात ४२ चेंडूत ८ चौकार व ७ षटकारांसह ८९ धावांची उत्कृष्ट खेळी केली. यानंतर इशान किशनने १८ चेंडूत ३९ धावा केल्या, तर कर्णधार सूर्याने ११ धावांचं योगदान दिलं. यानंतर शिवम दुबेने २५ चेंडूत १ चौकार व ४ षटकारांसह ४३ धावांची खेळी करत धावबाद झाला. तर हार्दिक पंड्याने २७ धावांची खेळी केली. तर तिलक वर्माने ३०० च्या स्ट्राईक रेटने ७ चेंडूत ३ षटकारांसह २१ धावा केल्या. यासह टीम इंडियाने ७ बाद २५३ धावांचा डोंगर उभारला.

भारताने उभारलेली २५३ ही धावसंख्या टी-२० विश्वचषक बाद फेरीतील कोणत्याही संघाने उभारलेली सर्वोच्च धावसंख्या आहे. भारताने वेस्ट इंडिजने रचलेला विश्वविक्रम मोडला. २०१२ च्या टी-२० विश्वचषकात ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या बाद फेरीच्या सामन्यात वेस्ट इंडिजने ४ विकेट गमावून २०५ धावा केल्या होत्या.

इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यात २५३ धावा करून भारताने आणखी एक विश्वविक्रम आपल्या नावे केला. टी-२० विश्वचषकात दोनदा २५०+ धावा करणारा भारत आता एकमेव संघ आहे. भारताने यापूर्वी झिम्बाब्वेविरूद्ध सामन्यातही २५० अधिक धावांचा डोंगर उभारला होता.

१९ षटकार अन् तिसरा विश्वविक्रम

भारताने या सामन्यातील एका डावात एकूण १९ षटकार लगावले. टी-२० विश्वचषकाच्या एकाच डावात भारताने १९ षटकार मारण्याची ही पहिलीच वेळ आहे. या धावसंख्येत संजू सॅमसन, शिवम दुबे आणि तिलक वर्मा या तीन भारतीय फलंदाजांनी सर्वाधिक योगदान दिलं. यासह टी-२० सामन्याच्या एकाच डावात १९ षटकार लगावणारा भारत हा पहिलाच संघ आहे.

याशिवाय एका टी-२० विश्वचषकात सर्वाधिक षटकार लगावणारा भारत पहिला संघ आहे. भारताने यंदाच्या विश्वचषकात ८८ षटकार लगावले आहेत. तर ७६ षटकार यंदा वेस्ट इंडिजने लगावले आहेत. यानंतर दक्षिण आफ्रिकेने यंदाच्या विश्वचषकात ७२ षटकार लगावले आहेत.