टी२० वर्ल्डकपसाठी संघाची घोषणा झाली तेव्हा निवडसमितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी सूर्यकुमार यादवकडे संघाची सूत्रं असतील आणि अक्षर पटेल उपकर्णधारपद असेल असं सांगितलं. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या अहमदाबाद इथे सुरू असलेल्या सुपर८ गटाच्या लढतीत उपकर्णधार अक्षर पटेलला संघाबाहेर ठेवण्यात आलं आहे.
शेवटच्या गटवार लढतीत भारतीय संघाने नेदरलँड्सविरुद्ध अक्षर पटेलला विश्रांती देत वॉशिंग्टन सुंदरला संघात समाविष्ट केलं होतं. तोच संघ कायम असेल असं कर्णधार सूर्यकुमार यादवने टॉसवेळी स्पष्ट केलं. अक्षरसंदर्भातला निर्णय कठोर आहे असं सूर्यकुमारने सांगितलं. अक्षरऐवजी संघव्यवस्थापनाने वॉशिंग्टनच्या नावालाच पसंती दिली आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या संघात क्विंटन डी कॉक, रायल रिकलटन, डेव्हिड मिलर असे डावखुरे फलंदाज आहेत. यांच्याविरुद्ध वॉशिंग्टनची ऑफस्पिन फिरकी उपयुक्त ठरू शकते. या विचारातून अक्षरऐवजी वॉशिंग्टनच्या नावाला प्राधान्य देण्यात आलं.
अक्षरने या वर्ल्डकपमध्ये ३ सामने खेळले असून ६ विकेट्स पटकावल्या आहेत. एका सामन्यात त्याला फलंदाजीची संधी मिळाली. त्यामध्ये त्याने १४ धावा केल्या. दुसरीकडे वॉशिंग्टनची वर्ल्डकपसाठीच्या संघात निवड झाली होती मात्र दुखापतीमुळे तो खेळू शकणार का याविषयी साशंकता होती. नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यात त्याने ४ षटकात ३६ धावा दिल्या. त्याने फलंदाजी केली नाही.
३२वर्षीय अक्षरने ९० सामन्यात भारताचं प्रतिनिधित्व करताना ७०० धावा केल्या असून ९२ विकेट्स पटकावल्या आहेत. २०२४ टी२० वर्ल्डकप स्पर्धेच्या फायनलमध्ये तीन फलंदाज झटपट तंबूत परतल्यानंतर अक्षरने साकारलेली संयमी खेळी चाहत्यांच्या आजही स्मरणात आहे. याच स्पर्धेत अक्षरने सीमारेषेनजीक घेतलेला अफलातून झेलही युट्यूबवर वारंवार पाहिला जातो.
आयपीएल स्पर्धेत अक्षरने १२८ विकेट्स घेतल्या असून, १९१६ धावाही त्याच्या नावावर आहेत.

