ENG vs IND : मराठी क्रिकेटपटूला लंडनमध्ये आदरांजली; विराटसेनेनं दिली ‘अशी’ मानवंदना

बीसीसीआयने भारतीय संघाचा राष्ट्रगीताच्या वेळी काळी फित बांधलेला फोटो पोस्ट केला आहे

Indian team paid homage to Vasoo Paranjape by wearing black ribbon
काळी फित बांधून भारतीय संघाची वासू परांजपेंना श्रद्धांजली
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या मालिकेतील चौथी कसोटी लंडनच्या ओव्हलमध्ये खेळली जात आहे. या सामन्यात टीम इंडियाचे खेळाडू त्यांच्या दंडावर काळ्या फिती बांधून मैदानावर उतरले आहेत. तेव्हापासून प्रत्येकजण हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे की भारतीय क्रिकेटपटूंनी आज काळ्या फिती बांधल्यात. मात्र, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने याचे उत्तर दिले आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) भारतीय खेळाडूंचा राष्ट्रगीताच्या वेळी काळी फित बांधलेला फोटो पोस्ट केला आहे. वासू परांजपे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी भारतीय संघ काळी फित बांधून मैदानात उतरला आहे. भारतीय संघाच्या या वर्तनाचे त्यांचे पुत्र जतीन परांजपे यांनी कौतुक केले. त्यांनी ट्विट केले, “परांजपे कुटुंब या भावनेने खूप प्रभावित झाले आहे.”

क्रिकेटचे द्रोणाचार्य म्हणून नावाजलेले प्रशिक्षक वासू परांजपे यांचे ३० ऑगस्टला निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. फलंदाज असो वा गोलंदाज, प्रत्येक खेळाडूचा स्वतंत्र अभ्यास करणारे, त्यानुसार त्याला प्रशिक्षण देणारा व्यक्ती म्हणून वासू परांजपे यांची ओळख होती. बडोदा आणि मुंबईसाठी त्यांनी २९ प्रथम श्रेणी सामने खेळले होते.

क्रिकेटमधील निवृत्तीनंतर परांजपे प्रशिक्षणाकडे वळले. गुणवत्तेची योग्य पारख करणारा अवलिया म्हणून त्यांना ओळखले जात होते.  एकदा त्यांनी १४ वर्षीय सचिन तेंडुलकरची मुश्ताक अली यांना ओळख करून दिली. तेव्हा ते म्हणाले होते, की हा सुनील गावसकरनंतर देशातील दुसरा सर्वोत्तम फलंदाज आहे.

सुनील गावसकर, ,सचिन तेंडुलकर, दिलीप वेंगसरकर, संजय मांजरेकर, राहुल द्रविड, संदीप पाटील, अनिल कुंबळे, युवराज सिंग, रमेश पवार यासोबतच श्रीलंकेचा सनथ जयसूर्या, रोशन महानामा यांना वासू परांजपे यांनी मार्गदर्शन केले आहे. गावसकरांना ‘सनी’ हे टोपणनाव त्यांनीच दिले. माजी भारतीय क्रिकेटपटू आणि निवड समितीचे सदस्य जतीन परांजपे यांचे ते वडील होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Indian team paid homage to vasoo paranjape by wearing black ribbon london oval eng vs ind 4th test srk