India T20 World Cup 2026 Jersey Launch: टी-२० विश्वचषक २०२६ ७ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. आगामी टी-२० वर्ल्डकप हा भारत आणि श्रीलंका यांच्या यजमानपदाखाली खेळवला जाणार आहे. काही दिवसांपूर्वीच या स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. त्यानंतर, आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान भारतीय संघाचा डाव संपल्यानंतर, बीसीसीआयने टी-२० विश्वचषकासाठी टीम इंडियाची जर्सी लाँच केली आहे.
भारताचा माजी टी-२० विश्वचषक विजेता कर्णधार रोहित शर्माला या स्पर्धेचा ब्रँड अँम्बेसिडर करण्यात आलं आहे, याची घोषणा आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांनी स्वत:केली होती. आता भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या वनडे सामन्यातील इनिंग्स ब्रेकदरम्यान रोहित शर्मा व तिलक वर्मा यांनी भारताची नवी टी-२० जर्सी लाँच करण्यात आली.
टीम इंडियाच्या टी-२० विश्वचषक २०२६ च्या जर्सीच्या कॉलरवर तिरंगा असणार आहे, तर पुढच्या बाजूला गडद निळ्या रंगाचे पट्टे असतील. तर हाताजवळ केसरी रंगाच्या बॉर्डर आहेत आणि त्याच रंगाने INDIA असं लिहिलेलं असणार आहे. तर खांद्यावर ‘आदिदास’ ब्रँडच्या त्या पांढऱ्या पट्ट्या असणार आहेत.
टी-२० विश्वचषक २०२६साठी कशी असणार भारताची जर्सी?
टीम इंडियाच्या या जर्सीवर दोन स्टार देखील आहेत, ज्याचा थेट अर्थ असा आहे की भारतीय संघाने दोनदा टी-२० विश्वचषक जिंकला आहे. एकदा २००७ मध्ये एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली आणि दुसऱ्यांदा २०२४ मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली, टीम इंडियाने टी-२० विश्वचषकाची ही आयसीसी ट्रॉफी जिंकली. रोहित शर्मा, तिलक वर्मा व बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया जर्सी लाँचदरम्यान उपस्थित होते. रोहित शर्मा हा टी-२० विश्वचषक २०२६ चा ब्रँड अँम्बेसडर असणार आहे.
भारतीय संघ आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये ७ फेब्रुवारीला मुंबईतील वानखेडे स्टेडियममधील सामन्यात आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. यानंतर, टीम इंडियाला आपला पुढचा सामना १२ फेब्रुवारी रोजी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर नामिबिया संघाविरुद्ध खेळायचा आहे. भारतीय संघ १५ फेब्रुवारीला कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध ग्रुप अ मधील तिसरा सामना खेळेल. टीम इंडिया ग्रुप स्टेजमधील अखेरचा सामना १८ फेब्रुवारीला अहमदाबाद स्टेडियमवर नेदरलँड्स संघाविरुद्ध खेळेल.
