भारताचा ट्वेन्टी-२० संघ समतोल असून जगाच्या पाठीवर कुठेही खेळण्यासाठी तयार असल्याचे मत भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने व्यक्त केले आहे. भारताने ट्वेन्टी-२० प्रकारातील गेल्या दहा सामन्यांत नऊ विजयाची नोंद केली आहे.

‘‘ट्वेन्टी-२० संघाच्या कामगिरीवर नजर टाकल्यास तो कोणत्याही परिस्थितीत आणि कोणत्याही प्रतिस्पर्धीला सामोरे जाण्यासाठी सक्षम असल्याचे दिसून येईल. सध्या ५० षटकांच्या क्रिकेटविषयी न बोललेले बरे, परंतु ट्वेन्टी-२०मध्ये आम्ही जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात खेळू शकतो,’’ असे धोनी म्हणाला. संयुक्त अरब अमिराती संघावरील विजयानंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत तो बोलत होता.

‘‘आमच्याकडे तीन योग्य जलदगती गोलंदाज आहेत, दोन फिरकीपटू आहेत आणि आवश्यकता पडल्यास कामचलाऊ गोलंदाजही आहे. माझ्या मते हे योग्य समीकरण आहे आणि एखाद्या वेळेस अधिक धावा करायच्या झाल्यास त्या ताकदीचे फलंदाजही आहेत. त्यामुळे संघ भारतात किंवा परदेशात कोणत्याही परिस्थितीत खेळण्यासाठी सज्ज आहे,’’ असे धोनी म्हणाला.