पदार्पणातच वेगवान गोलंदाज मोहित शर्माने आपल्या नेत्रदीपक कामगिरीने तमाम क्रिकेटजगताला ‘मोहित’ केले. पहिल्याच सामन्याचे दडपण न घेता त्याने झिम्बाब्वेची सलामीची जोडी फोडत आपल्या खात्यावर पहिला बळी मिळवला. या पायावर भारताने विजयाचे इमले बांधत पुन्हा एकदा झिम्बाब्वेला भुईसपाट केले.
भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारताने झिम्बाब्वेचा चौथ्या एकदिवसीय सामन्यात १४४ धावांमध्येच खुर्दा उडवला. मग रोहित शर्मा आणि सुरेश रैना यांच्या नाबाद अर्धशतकांच्या जोरावर भारताने झिम्बाब्वेच्या आव्हानाचा सहजपणे पाठलाग करत ९ विकेट्स आणि ११५ चेंडू राखत मालिकेत विजयाचा चौकार ठोकला. १०-३-२६-२ अशा पदार्पणातील दमदार पृथक्करणाच्या जोरावर मोहितने सामनावीर पुरस्कार पटकावला.
नाणेफेक जिंकत भारताने झिम्बाब्वेला फलंदाजीसाठी पाचारण केले आणि हा निर्णय योग्य असल्याचे गोलंदाजांनी दाखवून दिले. मोहित शर्माने भारताला पहिला बळी मिळवून दिल्यावर झिम्बाब्वेचा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला आणि त्यांची ५ बाद ४७ अशी दयनीय अवस्था झाली. झिम्बाब्वेचा संघ आता शतकाची वेसही ओलांडणार नाही, असे वाटत असतानाच माल्कर वॉलर आणि एल्टन चिगुम्बुरा यांनी सहाव्या विकेटसाठी ८० धावांची भागीदारी रचत झिम्बाब्वेला सुस्थितीत आणण्याचा प्रयत्न केला. पण वॉलर बाद झाल्यावर पुन्हा एकदा झिम्बाब्वेचा संघ भारतीय गोलंदाजांच्या चक्रव्यूहात सापडला. वॉलरने या वेळी ३ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ३५ धावांची खेळी साकारली, तर चिगुम्बुराने ४ चौकारांच्या जोरावर नाबाद ५० धावांची खेळी साकारत संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. मोहित आणि रवींद्र जडेजाने या वेळी प्रत्येकी दोन बळी मिळवले, तर मिश्राने झिम्बाब्वेची तळाची फळी चिरून काढत तीन बळी पटकावले.
झिम्बाब्वेच्या १४५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताला २६ धावांवर पहिला धक्का बसला. कसोटीमध्ये जम बसवलेल्या चेतेश्वर पुजाराला (१३) एकदिवसीय क्रिकेटमधील पदार्पणात चांगली कामगिरी करता आली नाही. पुजारा बाद झाला असला तरी त्यानंतर धावांसाठी झगडणाऱ्या रोहित शर्मा आणि सुरेश रैना यांनी या संधीचा सुरेख फायदा उचलला. या दोघांनी संयत खेळ करत दुसऱ्या विकेटसाठी १२२ धावांची अभेद्य भागीदारी रचत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. रोहितने ५ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर नाबाद ६४ धावांची खेळी साकारली, तर रैनाने ६ चौकारांच्या जोरावर नाबाद ६५ धावांची खेळी साकारली. भारताने या विजयासह मालिकेत ४-० अशी निर्विवाद आघाडी घेतली आहे.

धावफलक
झिम्बाब्वे : वुशीमुझी सिबांडा त्रि. गो. जडेजा २४, सिकंदर रझा झे. कार्तिक गो. शर्मा ७, हॅमिल्टन मसाकाझा धावचीत (जडेजा) १०, ब्रेंडन टेलर पायचीत गो. जडेजा ०, सीन विल्यम्स त्रि. गो. उनाडकट ०, माल्कम वॉलर झे. कार्तिक गो. शर्मा ३५, एल्टन चिगुम्बुरा नाबाद ५०, प्रॉस्पर उत्सेया झे. रोहित शर्मा गो. शामी १, तेंडई चटारा झे. जडेजा गो. मिश्रा १, ब्रायन व्हिटोरी त्रि. गो. मिश्रा ८, मायकेल चिनॉया झे. कोहली गो. मिश्रा ०, अवांतर ८, एकूण ४२.४ षटकांत सर्व बाद १४४.
बाद क्रम : १-१६, २-३६, ३-४४, ४-४७, ५-४७, ६-१२७, ७-१३०, ८-१३३, ९-१४३, १०-१४४.
गोलंदाजी : मोहित शर्मा १०-३-२६-२, मोहम्मद शामी ८-१-३४-१, जयदेव उनाडकट ७-०-२७-१, रवींद्र जडेजा ९-१-२८-२, अमित मिश्रा ८.४-०-२५-३.
भारत : चेतेश्वर पुजारा त्रि. गो. चटारा १३, रोहित शर्मा नाबाद ६४, सुरेश रैना नाबाद ६५, अवांतर ३, एकूण  २७ षटकांत १ बाद १४६.
बाद क्रम : १-२३.
गोलंदाजी : ब्रायन व्हिटोरी ५.५-१-२१-०, मायकेल चिनॉया ४-०-१४-०, तेंडई चटारा ५-१-३१-१,  प्रोस्पर उत्सेया ९-०-४२-०,  एल्टन चिगुम्बुरा २-०-१२-०, सीन विल्यम्स ४-०-२१-०, माल्कम वॉलर १-०-३-०.
सामनावीर : मोहित शर्मा.
मोहित शर्मा १०-३-२६-२