हंगेरी येथे झालेल्या मुलींच्या युरोपीयन गणित ऑलिम्पियाडमध्ये ( European Girls’ Mathematical Olympiad) भारतीय संघातल्या चारही मुलींनी कांस्यपदकं पटकावली आहेत. अनन्या रानडे, अनुष्का अगरवाल, गुंजन अगरवाल आणि सानिका बोराडे अशी या चार तरुणींची नावं आहेत. चार जणींच्या संघातील अनुष्का आणि गुंजन दोघी बहिणी आहेत. दुसरीकडे अनन्या आणि अनुष्का या दोघींची रौप्यपदकं केवळ एका पॉइंटने हुकली. दोन वर्षांच्या करोना काळानंतर भारतीय संघ यावर्षी ऑफलाईन सहभागी झाला होता.

मुलींच्या युरोपीयन गणित ऑलिम्पियाडमध्ये (EGMO) २०१५ नंतर पहिल्यांदाच चार मुलींचा पूर्ण क्षमतेचा भारतीय संघ ऑफलाईन सहभागी झाला. गेल्या वर्षी भारताचा संघ पूर्ण क्षमतेचा होता, पण सहभाग ऑनलाईन होता. हा भारतीय संघ बुधवारी (१३ एप्रिल) सकाळी मुंबईत परतणार आहे.

टाटा मूलभूत संशोधन संस्थेचे ‘होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र’ हे गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, खगोलशास्त्र या विषयांच्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाड स्पर्धांसाठी भारताचे प्रतिनिधित्व करणारे संघ निवडणारे आणि त्यांचे प्रशिक्षण करणारे भारत सरकारचे अधिकृत केंद्र आहे.

रशियन आक्रमणाला विरोध दाखवण्यासाठी स्पर्धेच्या आयोजकांकडून दोन निर्णय

१. यावर्षी रशियाला या स्पर्धेतून वगळण्यात आले.

२. रशियामधील चार मुलींना वैयक्तिक पातळीवर (कोणत्याही राष्ट्रीय झेंड्याशिवाय, किंवा राष्ट्रीय चिन्हाशिवाय) स्पर्धक म्हणून यायला परवानगी देण्यात आली. हे स्पर्धक मेडल, प्रमाणपत्र यासाठी पात्र होते.

दरम्यान, २०१६ आणि २०१७ मध्ये या स्पर्धेत सहभागी झालेली यूक्रेनच्या संघातून तरुणी युलिया (वय २१) हिचा रशियाच्या बॉम्ब हल्ल्यात खारकीव येथे मृत्यू झाला. तिच्यासमोर करिअरचे अनेक पर्याय समोर असून देखील तिने पुढे वंचित घटकातील मुलांच्या शिक्षणावर काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती.