Team India World Record in T20I: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाचवा टी-२० सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जात आहे. या मालिकेतील निर्णायक सामन्यात भारताच्या फलंदाजांनी वादळी फलंदाजी करत २३१ धावांची मोठी धावसंख्या उभारली. यादरम्यान टीम इंडियाने टी-२० इतिहासात मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे.
भारताने पाचव्या सामन्याची नाणेफेक गमावली आणि प्रथम फलंदाजी करण्याची संधी मिळाली. अभिषेक शर्मा व संजू सॅमसन यांनी भारताला चांगली सुरूवात करून दिली. पहिल्या विकेटसाठी दोघांनीही ३४ चेंडूंत ६३ धावांची भागीदारी केली. अभिषेक ३४ धावा तर संजू ३४ धावा करत बाद झाले. यानंतर तिलक वर्माने संघाची जबाबदारी घेत चांगली फलंदाजी केली. तिलक वर्माबरोबर हार्दिक पंड्याचं अहमदाबादमध्ये वादळ आलं.
हार्दिक पंड्याने अवघ्या १६ चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. तर २५ चेंडूंत ५ चौकार व ५ षटकारांसह ६३ धावांची उत्कृष्ट फलंदाजी केली. तर तिलक वर्माने ४२ चेंडूत १० चौकार व एका षटकारासह ७३ धावा केल्या. तर शिवम दुबेने ३ चेंडूत १० धावा केल्या. यासह भारताने अहमदाबादच्या मैदानावर २३१ धावांची दुसरा सर्वात मोठी धावसंख्या उभारली.
तिलक व हार्दिकने यादरम्यान ४४ चेंडूत १०५ धावांची महत्त्वपूर्ण भागीदरी रचली. या फटकेबाजीच्या बळावर भारताने २०० धावांचा टप्पा गाठला. यासह टीम इंडियाने टी-२० मधील आपला विक्रम अधिक मजबूत केला. भारतीय संघ टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळेस २०० अधिक धावा करणारा संघ आहे. भारताने तब्बल ४३ वेळा टी-२० क्रिकेटमध्ये २०० अधिक धावा केल्या आहेत.
टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळेस २०० अधिक धावा करणारे संघ
भारत – ४३ वेळा
सोमरसेट – ४० वेळा
चेन्नई सुपर किंग्स – ३८ वेळा
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – ३७ वेळा
यॉर्कशायर – ३६ वेळा
