चेन्नई : आगामी ऑलिम्पियाड बुद्धिबळ स्पर्धेमध्ये खुल्या आणि महिला विभागात प्रत्येकी दोन संघ यजमान भारताचे प्रतिनिधित्व करणार असून या संघांची सोमवारी घोषणा करण्यात आली. महिला संघामध्ये नागपूरची महिला ग्रँडमास्टर दिव्या देशमुखचाही समावेश करण्यात आला आहे.

पाच वेळचा विश्वविजेता बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद या स्पर्धेमध्ये भारतीय संघांच्या प्रेरकाच्या भूमिकेत दिसेल. ही स्पर्धा चेन्नईमध्ये २८ जुलै ते १० ऑगस्ट या कालावधीत रंगणार आहे.खुल्या विभागातील दोन्ही संघांमध्ये केवळ ग्रँडमास्टर खेळाडूंचा समावेश आहे. २०२०च्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा कर्णधार विदित गुजरातीची खुल्या गटातील पहिल्या संघात निवड झाली आहे. महिला विभागातील पहिल्या भारतीय संघामध्ये कोनेरू हम्पी आणि जागतिक क्रमवारीत १०व्या स्थानी असणारी द्रोणावल्ली हरिका या तारांकित खेळाडूंचा समावेश आहे.