आपल्यावर होणाऱ्या टीकेला कृतीनेच उत्तर देणे किती सयुक्तिक असते याचा प्रत्यय आशियाई क्रीडा स्पर्धेत पाच पदकांची कमाई करणाऱ्या टेनिस चमूने दिला आहे. लंडन ऑलिम्पिकवेळी झालेल्या वादाचे व्रण कायम असताना या स्पर्धेसाठी संघनिवड झाली. आशियाई क्रीडा स्पर्धा केवळ देशप्रेमासाठी- त्यातून क्रमवारीचे गुण आणि बक्षीस रक्कम मिळत नाही, हे कारण देत लिएण्डर पेस, रोहन बोपण्णा आणि सोमदेव देववर्मनने स्पर्धेतून माघार घेतली. सानिया मिर्झानेही हीच भूमिका घेतली होती. मात्र संघटनेच्या पुढाकारानंतर तिने खेळण्याचा निर्णय घेतला. तीन प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत निवड समितीने युवा संघ निवडला. देशासाठी पदक मिळवण्यापेक्षा व्यवहार्य गोष्टींना महत्त्व देणाऱ्या खेळाडूंवर टीकाही झाली. त्यांच्या गैरहजेरीमुळे भारतीय संघ कमकुवत झाला आहे, त्यामुळे हमखास पदकांची संख्या घटली अशी भाकितेही वर्तवण्यात आली. मात्र या चर्चीय गोतावळ्यांना वाचाळपणे प्रत्युत्तर देण्याऐवजी टेनिसपटूंनी कोर्टवर घाम गाळून अथक मेहनतीला प्राधान्य दिले. या मेहनतीचे फळ इन्चॉनमधून परतताना त्यांच्या गळ्यात पदकाच्या रूपाने स्थिरावले आहे. भारतीय टेनिसचा परीघ पेस-भूपती या दोघांभोवतीच वर्षांनुवर्षे मर्यादित राहिला. काही काळानंतर त्यात बोपण्णाची भर पडली. परंतु या त्रिकुटाव्यतिरिक्त दुसऱ्या स्तरावर खेळणारी मंडळी उपेक्षितच राहिली. एका अर्थी प्रमुख खेळाडूंची माघार हे युकी भांब्री, दिविज शरण, सनम सिंग, साकेत मायनेनी यांना आपले कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी मिळालेले व्यासपीठच होते आणि त्यांनी या संधीचे सोने केले.
पुरुष दुहेरीच्या सामन्यानंतर अवघ्या काही तासात साकेत मिश्र दुहेरीत सानिया मिर्झाच्या साथीने खेळायला उतरला. त्याचा खेळात कोणताही थकवा जाणवला नाही. सानियाला उत्तम साथ देत साकेतने सुवर्णपदक नावावर केले. पेस-भूपतीनंतर दुहेरीत भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आम्ही सक्षम आहोत हे साकेत-सनम-युकी आणि दिविजने सिद्ध केले आहे. पेस-भूपतीच्या खेळातले नैपुण्य आणि सातत्य आणण्यासाठी या युवा खेळाडूंना वेळ लागेल, मात्र ते आणण्याची मानसिक बैठक तयार असल्याचा आशावाद या स्पर्धेच्या निमित्ताने मिळाला आहे. अनुभव आणि व्यावसायिकता याचा सुरेख मिलाफ घडवत सानिया मिर्झाने पदकांबरोबरच युवा खेळाडूंच्या मार्गदर्शकाची भूमिकाही निभावली आहे. टोकियो येथील स्पर्धेत कॅरा ब्लॅकच्या साथीने खेळताना सानियाने पॅन पॅसिफिक स्पर्धेचे जेतेपद पटकावले. काही तासांतच ती इन्चॉनमध्ये दाखल झाली. आपल्यापेक्षा वयाने दहा वर्षे लहान असणाऱ्या खेळाडूंची ऊर्जा, तयारी यांच्याशी जुळवून घेत सानियाने मिश्र दुहेरीत सुवर्ण तर महिला दुहेरीत कांस्यपदक पटकावले. प्रवास, विभिन्न वातावरण, अनुनभवी साथीदार या कशाचाही बाऊ न करता सानियाने दमदार कामगिरीसह पदक पटकावत टीकाकारांना चपराक लगावली आहे. मिश्र दुहेरीच्या लढतीनंतर अवघ्या चार तासात बीजिंग येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी सानिया रवाना झाली. व्यावसायिक खेळाडूंना मिळणारा पैसा आणि प्रसिद्धीची नेहमी चर्चा होते. मात्र ते मिळवण्यासाठीचा मार्ग किती खडतर असतो हे सानियाच्या उदाहरणाने स्पष्ट झाले आहे. २००२ साली ब्युसान, कोरिया येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठीच्या टेनिस संघात १६ वर्षीय सानिया मिर्झाचा समावेश होता. त्या दौऱ्यात खेळण्यापेक्षा सानियाची भूमिका शिकण्याची होती.
इन्चॉनमध्ये होत असलेल्या आशियाई स्पर्धेसाठीच्या टेनिस संघात २७ वर्षीय सानिया सगळ्यात अनुभवी खेळाडू होती. खेळतानाच युवा खेळाडूंना समजून घेण्याची, त्यांना मार्गदर्शनाची अतिरिक्त जबाबदारी तिच्यावर होती. दुहेरी जबाबदारी समर्थपणे पेलताना सानियाने आशियाई क्रीडा स्पर्धेत एकूण आठ पदके नावावर केली आहेत. योगायोग म्हणजे २००२ आणि आताही भारतीय संघाचे मार्गदर्शक आनंद अमृतराजच होते. या यशात प्रशिक्षक त्यांची भूमिका निर्णायक आहे. महिला दुहेरीत सानियाला महाराष्ट्राच्या प्रार्थना ठोंबरेने उत्तम साथ दिली. सानिया मिर्झाच्या साथीने खेळायला मिळणे आणि आशियाई स्पर्धेत पदक अशी दुहेरी संधी आणि यश प्रार्थनाने साध्य केले आहे. दुहेरीत दमदार आगेकूच होत असतानाच एकेरी हा भारतासाठी कच्चा दुवा आहे. युकीने कांस्यपदकावर कब्जा करत आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. मात्र तरीही पुरुष आणि महिलांमध्ये एकेरीत आंतरराष्ट्रीय स्तरावर स्थान मिळण्यासाठी या खेळाडूंना अजूनही मोठा पल्ला गाठायचा आहे हे स्पष्ट झाले आहे.