अमान (जॉर्डन) : भारतीय फुटबॉलसाठी सोमवारचा दिवस धक्कादायक विजयांची नोंद करणारा ठरला. एकीकडे भारतीय युवा संघाने अर्जेटिनाला धूळ चारली, तर पश्चिम आशियाई फुटबॉल महासंघाच्या (वॅफ) १६ वर्षांखालील मुलांच्या अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेत भारतीय कुमार संघाने आशियाई विजेत्या इराकवर १-० असा निसटता विजय मिळवला. भुवनेशने शेवटच्या मिनिटाला हेडरद्वारे केलेल्या गोलमुळे भारताने कोणत्याही फुटबॉल स्पर्धेत तसेच कोणत्याही वयोगटात प्रथमच इराकवर मात केली. यापूर्वीच्या लढतीत जपानविरुद्ध भारताला २-१ असा पराभव पत्करावा लागला होता. भारत व इराक याआधी एएफसी पात्रता फेरीत (१६ वर्षांखालील) एकमेकांसमोर आले होते. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये कमालीची चुरस पाहायला मिळाली. अखेरीस भुवनेशने गोल करताच संपूर्ण भारतीय संघाने मैदानावर धाव घेतली व विजयाचा जल्लोष केला.